Join us  

गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश, राजकारणात घेणार 'पिंगा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 1:26 PM

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित ३१ मार्च २०२१ रोजी वैशाली माडेचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे यापूर्वी ठरले होते

ठळक मुद्दे 'बाजीराव मस्तानी' या हिंदी सिनेमातील 'पिंगा' हे तिनं गायलेलं गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय.

मुंबई - महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका आणि बॉलिवूडची सिंगर वैशाली माडे हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तीने घड्याळ हाती घेतलं. त्यामुळे, आता वैशालीचा राजकारणात सूर लागणार आहे. तिच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी वैशालीचं स्वागत केलं आहे. मंत्री धनंजय मुंडेंनीही ट्विट करुन तिचं स्वागत केलं आहे. 

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित ३१ मार्च २०२१ रोजी वैशाली माडेचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे यापूर्वी ठरले होते. मात्र, कोरोनाचं संकट वाढल्यामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर, आज वैशालीने अधिकृतपणे राष्ट्रवादीचे सदस्यत्व स्विकारले आहे. यावेळी, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. 

कोण आहे वैशाली माडे?

वैशाली ही विदर्भाच्या मूळ हिंगणाघाट येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी असून हिंदी व मराठी भाषेतील सिनेमांमध्ये तिनं पार्श्वगायन केलंय. 'बाजीराव मस्तानी' या हिंदी सिनेमातील 'पिंगा' हे तिनं गायलेलं गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. तसंच तिनं 'कलंक' या हिंदी सिनेमातील 'घर मोरे परदेसिया' हेही गाणं गायलं आहे. मराठी चित्रपटांतही तिनं अनेक गाणी गायली आहेत. 'सारेगमप' या स्पर्धेची विजेती ठरल्यानंतर वैशालीला हिंदी सारेगमप या शोचीदेखील ती विजेती ठरली. हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला. दरम्यान, वैशाली 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

टॅग्स :वैशाली माडेअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसधनंजय मुंडे