मुंबईत साधेपणाने आगमन सोहळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 14:20 IST2020-08-21T14:18:34+5:302020-08-21T14:20:54+5:30
वरुण राजाही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आला आहे.

मुंबईत साधेपणाने आगमन सोहळे
मुंबई : गणपतीच्या आगमनासाठी आता मुंबापुरी सज्ज झाली असून, वरुण राजाही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आला आहे. शुक्रवारी सकाळपासून मुंबई शहरासह पूर्व व पश्चिम उपनगरात, ठाणे, नवी मुंबईत धो धो कोसळत असलेल्या जल धारांत साधेपणाने श्री गणेशाचे आगमन सोहळे होत होते.
कोरोनामुळे सगळ्यांचे कंबरडे मोडले आहे. गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला कोरोनाची झळ बसली आहे. आता तर कोरोनाचा सण उत्सवावर देखील परिणाम झाला आहे. मुंबईत दरवर्षी उत्सवावर लाखो कोटयवधी खर्च केले जातात. गणेशोत्सव तर मुंबईचा जीव की प्राण. मात्र यंदाच्या गणेशोत्सावर कोरोनाचे संकट आहे. परिणामी कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर पळविण्यासाठी प्रत्येज जण सज्ज झाला आहे. आणि याचे उदाहरण म्हणून यावर्षी प्रत्येक मुंबईकराने विशेषत: इथल्या तरूणाईने गणेशोत्सवऐवजी आरोग्यासह पर्यावरणोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी दुपारपर्यंत मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली असून, सायंकाळ, रात्रीसह शनिवारीदेखील पावसाचा हा जोर मुंबईत कायम राहणार आहे.
कोरोनाचे सावट असले तरी देखील मुंबई, ठाण्यात गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीकरिता मुंबईतल्या स्थानिक आणि लालबाग, दादरसारख्या बाजारांत सकाळी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र अधून मधून पावसाचा जोर वाढत असल्याने त्यांची तारांबळ उडाली. परंतू दुपारी बारानंतर पाऊस ब-यापैकी थांबल्याने खरेदीस पुन्हा आदीच्या उत्सााने सुरूवात झाली.