Join us

एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 05:49 IST

दहिसर येथील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना मुंबईच्या विकासावरून लक्ष्य केले.

मुंबई : मुंबई महापालिका २५ वर्षे तुमच्याकडे आहे. राज्यात अडीच वर्षे तुम्ही सत्तेत होता. या सगळ्या काळात केलेला एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा. कोणताही आयकॉनिक प्रोजेक्ट हे दाखवू शकत नाहीत. कारण यांच्याकरिता मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आणि कोंबडीचे अंडे खात आपले दुकान चालवायचे हेच काम यांनी केले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी दहिसर येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

महायुतीच्या उमेदवार मनीषा चौधरी यांच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईत २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत आपण परिवर्तन केले. मुंबईकरांची एनर्जी प्रवासात जाते. त्यांना दिलासा देण्यासाठी लोकल चांगली केली. मेट्रोचे नेटवर्क चांगले केले. कोस्टल रोड केला. कोस्टल रोड विरारपर्यंत जाणार आहे. प्रत्येक वेस्टर्न सबर्बला कोस्टल रोडशी जोडणार आहोत. त्यामुळे वेस्टर्न हायवेवर जाम लागणार नाही. 

कोविडमध्ये मविआने मलिदा खाल्ला!

एसआरए, म्हाडामध्ये पारदर्शी कारभार आणला. मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण करत आहोत. मुंबई चांगली झाली पाहिजे, केवळ रस्ते चांगले करून चालत नाही. मृताला ज्या बॅगमध्ये ठेवतात; त्या बॅगच्या खरेदीत उबाठाने घोटाळा केला. कोविडमध्ये उबाठा आणि मविआने मलिदा खाल्ला, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे