Join us  

पोलिसांनी नागरिकांना मारावे की मारू नये?; उद्धव ठाकरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 3:00 AM

गावे आणि शहरांमध्ये पोलीस अचानक दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना अडवतात आणि कोणत्या कारणासाठी ते बाहेर पडले आहेत.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदीच्या काळात रस्त्याने फिरणाऱ्या सामान्य नागरिकांना पोलिसांनी लाठ्यांनी मारावे की मारू नये? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशी मारहाण करू नका असे बजावले असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र लाठीधारी पोलीस शिपायाला चक्क वृत्तवाहिनीवर आणून या लाठीचा वापर केल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही अशी ताकीद दिली.

गावे आणि शहरांमध्ये पोलीस अचानक दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना अडवतात आणि कोणत्या कारणासाठी ते बाहेर पडले आहेत याची साधी चौकशी न करता थेट लाठ्यांनी मारायला सुरुवात करतात असे व्हिडिओ गेले चार दिवस महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

विश्वसनीय सूत्रांनी सांगितले, की पोलिसांच्या अशा वर्तणूकविरुद्ध काही जणांनी थेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना फोन करून अशा पद्धतीने नागरिकांना पोलिसांनी मारहाण करू नये असे बजावले.

एकीकडे मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका घेतली असताना दुसरीकडे गृहमंत्री देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीस मुलाखत देत असताना एका पोलीस शिपायाला बोलाविले. त्याच्या हातात काठी होती. ‘‘घराबाहेर पडू नका असे आम्ही सांगून थकलो, आता लाठीच्या वापराशिवाय पर्याय नाही’’ असे देशमुख यांनी या मुलाखतीत सांगितले. या लाठीचा नुसता वापर करू नका तिला तेल लावून ठेवा आणि मग वापरा, असेही देशमुख या मुलाखतीत म्हणाले होते. त्यांच्या या विधानांमुळे मारहाण करण्यास पोलिसांना बळच मिळाले असे म्हटले जाते.

राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले, की देशमुख यांनी घेतलेली भूमिका ही अपरिहार्यतेतून आलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कितीही सांगून लोक ऐकत नसतील तर बळाचा वापर करण्याशिवाय पर्याय उरत नाही. झुंडीने फिरणाºया बेलगाम टोळक्यांना जरब बसवायची तर लाठीठीशिवाय पर्याय नाही. पोलिसांनी हा न्याय सरसकट लावू नये. गरजू आणि बेलगाम यांच्यात फरक करावा. तो कसा करायचा हे पोलिसांना बरोबर कळते.

लष्कर बोलावण्याची वेळ आणू नका - अजित पवार

कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी रस्त्यावर उतरलेले पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाºयांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेअनिल देशमुखपोलिस