धक्कादायक! वेटरचा मध्य रेल्वेला गंडा; व्हीआयपी कोट्यावर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 06:04 IST2025-04-07T06:03:54+5:302025-04-07T06:04:08+5:30
अधिकाऱ्यांच्या बनावट सही-शिक्क्यांचा वापर

धक्कादायक! वेटरचा मध्य रेल्वेला गंडा; व्हीआयपी कोट्यावर डल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या बनावट सही आणि शिक्क्यांच्या आधारे आपत्कालीन व्हीआयपी कोट्यातून तिकिटे कन्फर्म करण्याचा कॅन्टीनमधील वेटरचा गोरखधंदा उघडकीस आला आहे. वेटरने या प्रकारातून लाखो रुपयांची कमाई केल्याचा कयास आहे. त्याला दक्षता विभागाच्या निरीक्षकांनी ताब्यात घेतले आहे.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील रेल्वे कॅन्टीनमधील कामगार रवींद्र कुमार साहू वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा देण्याचे काम करत होता. त्याने वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य अभियंता यांचे बनावट सही-शिक्के तयार करून घेतले होते. प्रवाशांची तिकिटे कन्फर्म करण्यासाठीच्या विनंती पत्रासाठी तो याच सही-शिक्क्यांचा वापर करीत
होता. व्हीआयपी कोट्यातून तिकिटे कन्फर्म करण्याच्या मोबदल्यात तो महिन्याकाठी दीड ते दोन लाखांची कमाई करत होता, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कसा सापडला?
कोलकाता मेलमधील प्रवाशांची तिकिटे तपासताना मध्य रेल्वेचे मुख्य दक्षता निरीक्षक जितेंद्र शर्मा आणि आर. एस. गुप्ता यांच्या पथकाला काही प्रवाशांनी आम्ही अधिक पैसे देऊन तिकिटे कन्फर्म केल्याचे सांगितले. दक्षता अधिकाऱ्यांनी माहितीची शहानिशा करून चौकशी सुरू केली. त्यातून सीएसएमटीच्या रेल्वे कॅन्टीनमधील कामगार रवींद्र साहू व्हीआयपी कोट्याचा गैरवापर करत असल्याचे उघड झाले.
लाखो रुपयांची कमाई
रवींद्र साहू तीन महिन्यांपासून व्हीआयपी कोट्याचा गैरवापर करत असल्याचे उघड झाले आहे. प्रत्यक्षात दोन वर्षांपासून त्याचा हा गोरखधंदा सुरू असल्याचा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रवाशांना कन्फर्म तिकीट देऊन त्यांच्याकडून हजारो रुपयांची कमाई करत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या प्रकारातून त्याने लाखो रुपये कमावल्याचा कयास आहे.