धक्कादायक! भावाने कुटुंबीयांसमोरच चाकूचे वार करून बहिणीला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 12:05 IST2025-04-27T12:04:39+5:302025-04-27T12:05:13+5:30
अनवया पैगणकर असे मृत बहिणीचे नाव आहे. त्या विलेपार्ले पश्चिमेकडील लल्लू भाई पार्क परिसरात राहत होत्या. तर, आशिष करंदीकर असे आरोपी भावाचे नाव आहे.

धक्कादायक! भावाने कुटुंबीयांसमोरच चाकूचे वार करून बहिणीला संपवले
मुंबई : संपत्तीच्या वादातून ५५ वर्षांच्या व्यक्तीने शिक्षिका असलेल्या त्याच्या ५७ वर्षांच्या बहिणीवर चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी विलेपार्ले येथे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. जुहू पोलिसांनी हल्लेखोर भावाला अटक केली आहे.
अनवया पैगणकर असे मृत बहिणीचे नाव आहे. त्या विलेपार्ले पश्चिमेकडील लल्लू भाई पार्क परिसरात राहत होत्या. तर, आशिष करंदीकर असे आरोपी भावाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, करंदीकर बेरोजगार असून, तो घर सोडून मेघालयात वास्तव्यास होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी तो मुंबईत परतला आणि त्याच्या कुटुंबासह राहू लागला. दरम्यानच्या काळात, त्याच्या आईने मालमत्ता अनवया हिच्या नावावर केली होती.
मालमत्तेवरून सतत वाद
भावंडांमध्ये मालमत्तेवरून वाद होत होते. करंदीकर याने शुक्रवारी सकाळी स्वयंपाक घरातून चाकू घेतला आणि कुटुंबीयांसमोर अनवया हिच्यावर तीन वेळा वार केले. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
करंदीकर याची पत्नी त्याला १३ वर्षांपूर्वी सोडून गेली असून, त्याला दोन मुले आहेत. जुहू पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.