गच्चीवर रेस्टॉरंटसाठी शिवसेनेची व्यूहरचना, पहारेक-यांचा डाव उलटविण्यासाठी विरोधकांना गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 04:02 AM2017-09-29T04:02:15+5:302017-09-29T04:02:37+5:30

महापालिकेत सत्तेत भागीदार असतानाही गच्चीवरील रेस्टॉरंटला विरोध करणा-या भाजपाने अद्याप बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे लटकलेला हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे युवराज स्वत: मैदानात उतरले आहेत.

Shivsena's strategy for the restaurant at Gachivar; | गच्चीवर रेस्टॉरंटसाठी शिवसेनेची व्यूहरचना, पहारेक-यांचा डाव उलटविण्यासाठी विरोधकांना गळ

गच्चीवर रेस्टॉरंटसाठी शिवसेनेची व्यूहरचना, पहारेक-यांचा डाव उलटविण्यासाठी विरोधकांना गळ

Next

मुंबई : महापालिकेत सत्तेत भागीदार असतानाही गच्चीवरील रेस्टॉरंटला विरोध करणा-या भाजपाने अद्याप बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे लटकलेला हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे युवराज स्वत: मैदानात उतरले आहेत. पहारेकºयांचा विरोध मावळणे शक्य नसल्याने आपल्या युवराजांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेचे शिलेदारही कामाला लागले आहेत. त्यानुसार हा प्रस्ताव फेटाळण्याचा भाजपाचा डाव उलटविण्यासाठी विरोधी पक्षांना गळ टाकण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
मुंबईत गच्चीवरील रेस्टॉरंटची मागणी आदित्य ठाकरे यांनी लावून धरली. २०१५मध्ये तत्कालीन मित्रपक्ष भाजपानेच काँग्रेसला हाताशी धरून हा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत फेटाळला़ परंतु या स्वप्नावर पाणी फेरूदेण्यास युवराज तयार नाहीत. त्यामुळे दोन वर्षांनंतर हा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रस्तावावर शिवसेना सर्व पक्षाचे मत आजमावत आहे. मात्र स्वतंत्र निवडणूक लढविल्यानंतर भाजपा या प्रस्तावाला पाठिंबा देणार नाही. त्यामुळे पालिका महासभेत हा प्रस्ताव आल्यास त्यावर मतदान होऊन शिवसेनेची फजिती होण्याची शक्यता आहे. परंतु भाजपा आता पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याने हा पराभव शिवसेनेला मान्य होणार नाही. यासाठी सबुरीचा मार्ग धरत महासभेच्या पटलावर असलेला हा प्रस्ताव लांबणीवर टाकला आहे.

युवराजांची धावपळ
हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात गेल्या दोन वर्षांत शिवसेनेला यश आले नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी स्वत: धावपळ सुरू केली आहे. यासाठी त्यांनी
पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन या धोरणाबाबत त्यांचे मत जाणून घेतले. या प्रकल्पामुळे नोकरीची संधी बेरोजगारांना उपलब्ध होईल; तसेच पालिकेचाही महसूल वाढेल, असा दावा त्यांनी केला.

असा लटकला
होता प्रस्ताव
मुंबईत गच्चीवरील रेस्टॉरंट बेकायदा पद्धतीने सुरू असल्याने ते अधिकृत करून पालिकेचा महसूल वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने २०१२ मध्ये घेतला़ समाजवादी पक्षाचे फराहन आझमी यांच्या मागणीनुसार हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंजुरीसाठी सुधार समितीपुढे पाठविण्यात आला़ आदित्य ठाकरे यांच्या नाइटलाइफच्या प्रस्तावाला धरून असलेल्या या प्रस्तावाला शिवसेनेचे समर्थन होते़ मात्र भाजपाने काँगे्रस, राष्ट्रवादी, मनसे या विरोधी पक्षांच्या मदतीने सुधार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळला होता़

नव्या बदलांसाठी शिवसेना राजी
या प्रस्तावाला भाजपाचा विरोध आहे. त्यामुळे या प्रस्तावावर पालिका महासभेत मतदान होण्याची शक्यता आहे. अशा वेळी विरोधकांचा कौल शिवसेनेच्या बाजूने पडल्यास या प्रस्तावाचा मार्ग मोकळा होईल.
भाजपाचे पालिकेत ८२ सदस्य असून, दोन अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. तर शिवसेनेचे अपक्षांसह मिळून ८७ सदस्य आहेत. त्यामुळे भाजपाने विरोधकांना गाठण्याआधी शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी या प्रस्तावात काही बदल करण्यासही शिवसेना नेते राजी आहेत.

अशा बदलांची शक्यता
रेफ्युजी एरियाची सक्ती, गच्चीवर प्रसाधनगृहास मनाई, कचरा प्रक्रिया सक्तीचे तसेच अग्निरोधक उपाययोजना असे काही बदल सुचविण्यात आले आहेत.

यासाठी हवे गच्चीवर रेस्टॉरंट : मुंबईत आठशे ठिकाणी गच्चीवर रेस्टॉरंट्स चालविली जात आहेत़ त्यांच्यावर पालिकेने अनेक वेळा कारवाई केली़ तरीही अनेक ठिकाणी अशी रेस्टॉरंट्स सुरूच असून, यात पालिकेचा महसूल बुडतो आहे़ त्यामुळे गच्चीवर रेस्टॉरंटला परवानगी देण्याची मागणी हॉटेलमालकांकडून पुढे आली होती़ ही मागणी मान्य करीत प्रशासनाने धोरण तयार केले़

भाजपाचा
विरोध कशाला
आदित्य ठाकरे यांच्या नाइटलाइफप्रमाणेच गच्चीवर रेस्टॉरंटचा प्रस्ताव हे पाश्चात्त्य खूळ असून, यामुळे संस्कृती धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करीत भाजपाने यास विरोध दर्शविला होता़

वादळी चर्चेची शक्यता
मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्याच्या आदित्य ठाकरे यांच्या स्वप्नाला भाजपाने सुरुंग लावला़ त्यानंतर गच्चीवरील रेस्टॉरंटचा प्रस्तावही सुधार समितीमध्ये बारगळला़ त्याचवेळी भाजपाने रात्रबाजारपेठेची आपली संकल्पना मंजूर करून शिवसेनेला दणका दिला़ त्यामुळे गच्चीवर रेस्टॉरंटच्या प्रस्तावावर पालिका महासभेत वादळी चर्चेची शक्यता आहे.

Web Title: Shivsena's strategy for the restaurant at Gachivar;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.