Join us

शरद पवारांना डोकं नावाचा प्रकारही नाही- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 15:30 IST

पगडी-पागोट्यावरुन उद्धव ठाकरेंची पवारांवर टीका

मुंबई: पगड्यांचं राजकारण करणाऱ्या शरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. पुणेरी पगडी नाकारुन पागोट्याला पसंती देण्याची शरद पवारांची कृती अतिशय चर्चेत राहिली होती. यावरुन उद्धव ठाकरेंनी पवारांवर शरसंधान साधलं. पगड्यांचं राजकारण करु नका, असा सल्ला यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुणेरी पगडी परिधान करण्यात येत होती. त्यावेळी शरद पवार मंचावर उपस्थित होते. भुजबळांना पुणेरी पगडी परिधान करणाऱ्या व्यासपीठावरील मान्यवरांना पवारांनी रोखलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील कार्यक्रमांमध्ये पागोटंच वापरलं जाईल, अशी घोषणा त्यावेळ मंचावरुन केली होती. पवारांच्या या सांकेतिक राजकारणावर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे. 'पगड्यांपेक्षा त्या परिधान करणाऱ्या व्यक्तींच्या विचारांनी पुढे जायला हवं. लोकमान्य टिळकांनी 'इंग्रज सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारला होता. पवारांना तोदेखील प्रश्न विचारता येत नाही. कारण डोकं ठिकाणावर असायला आधी डोकं असावं लागतं. पवारांना डोकं नावाचा प्रकारही नाही,' अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. सध्या देशातील वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्यांना अघोषित आणीबाणीचा सामना करावा लागत असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. दुसरी आणीबाणी येत आहे, ती मोडून काढा, असं आवाहन त्यांनी केलं. जुमलेबाजीनं आपला घात केलाय, असंही ते म्हणाले. 'मोदी सरकारकडून जोरदार जाहिरातबाजी सुरू आहे. मोदींच्या दाव्याची पडताळणी करुन सत्य समोर आणणाऱ्या पत्रकारांना घरचा रस्ता दाखवला जात आहे,' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे बरसले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशरद पवारशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसनरेंद्र मोदी