मुंबई महापालिकेत भाजपाला धक्का; एकाच आठवड्यात शिवसेनेचा डबल धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 05:58 PM2020-02-06T17:58:20+5:302020-02-06T18:01:10+5:30

शिवसेनेच्या संदीप नाईक यांचा नगरसेवकपदाचा मार्ग मोकळा

shiv senas corporator tally will increase by two in mumbai municipal corporation | मुंबई महापालिकेत भाजपाला धक्का; एकाच आठवड्यात शिवसेनेचा डबल धमाका

मुंबई महापालिकेत भाजपाला धक्का; एकाच आठवड्यात शिवसेनेचा डबल धमाका

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई: मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकनं वाढली आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८१ मधून विजयी झालेल्या भाजपाच्या मुरजी पटेल यांचं नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा आज लघुवाद न्यायालयात न्यायमूर्ती स्वर्णिता महालेंनी केली. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या संदीप नाईक यांचा नगरसेवकपदाचा मार्ग मोकळा झाला. 

एकाच आठवड्यात शिवसेनेचं महापालिकेतलं संख्याबळ दोननं वाढलं आहे. नाईक यांच्या आधी एकनाथ हुंडारे यांचाही नगरसेवकपदाचा मार्ग मोकळा झाला. याबद्दलची घोषणादेखील न्यायमूर्ती स्वर्णिता महालेंनीच केली होती. प्रभाग क्रमांक 28 चे काँग्रेसचे नगरसेवक राजपत यादव यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यानं दुसऱ्या क्रमांकावरील एकनाथ हुंडारे यांच्या नगरसेवकपदाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे या आठवड्यात शिवसेनेचं महापालिकेतलं संख्याबळ आता दोननं वाढणार असून अपक्षांसह शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांची संख्या 97 होणार आहे.

अठराव्या कोर्ट रूमच्या न्यायमूर्ती स्वर्णिता महाले यांनी उपरोक्त निवडणुकीसंदर्भातील निवडणूक याचिका ३४/२०१७ आदेशिका प्रविष्ट प्रकरण आज निकाली काढले. संदीप  नाईक यांना प्रभाग क्र. ८१ चे नगरसेवक म्हणून घोषित करण्यासंदर्भात याचिका मान्य केली.  संदीप नाईक यांना नगरसेवक घोषित करण्याचे तसे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिलेले आहेत. सदर प्रकरणी वकील बाळकृष्ण जोशी, विरेंद्र पेठे, दर्शना पवार, चिंतामणी भणगोजी, सुनील कोकणे यांनी संदीप नाईक यांची बाजू मांडली. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून संदीप नाईक यांच्या नगरसेवकपदाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 

Web Title: shiv senas corporator tally will increase by two in mumbai municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.