'माझी जन्मठेप' वाचा, मग सावरकर समजतील; शिवसैनिकांनी राहुल गांधींना पाठवलं पुस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 04:36 PM2019-12-16T16:36:32+5:302019-12-16T16:37:14+5:30

सावकरांबद्दलच्या विधानानंतर शिवसैनिकांनी राहुल गांधींना स्पीड पोस्टनं पुस्तक पाठवलं

shiv sena workers sends mazi janmathep book to congress leader rahul gandhi after his comment on veer savarkar | 'माझी जन्मठेप' वाचा, मग सावरकर समजतील; शिवसैनिकांनी राहुल गांधींना पाठवलं पुस्तक

'माझी जन्मठेप' वाचा, मग सावरकर समजतील; शिवसैनिकांनी राहुल गांधींना पाठवलं पुस्तक

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर

मुंबई: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची माहिती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना समजावी यासाठी शिवसेना उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांनी त्यांना माझी जन्मठेप पुस्तक पाठवलं आहे. आज सकाळी विलेपार्ले पूर्वेतील पोस्ट ऑफिसमधून जनावळेंनी राहुल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पुस्तक पाठवलं.

राहुल गांधींना सावरकर समजावे म्हणून सावरकरांचे माझी जन्मठेप हे पुस्तक आज सकाळी जलद टपालाने विलेपार्ले पूर्व नेहरू रोड येथील पोस्ट कार्यालयातून पाठवल्याचं जितेंद्र जानावळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं. हे पुस्तक राहुल गांधी यांनी वाचल्यास त्यांना नक्कीच सावरकरांची महती समजेल आणि यापुढे ते सावरकरांबद्धल बेताल वक्तव्य करणार नाहीत, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे तेज, त्याग आणि धाडस. हे गुण अंगी नसलेल्या राहुल गांधींनी सावरकरांबद्दल बोलणे म्हणजे बालिशपणा असल्याची टीका जनावळांनी केली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील टपाल तिकीटाचं अनावरण केलं होतं आणि माजी पंतप्रधान पंडित जहवारलाल नेहरु यांनी अंदमान सावरकर भूमीचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन केलं होतं. काँग्रेसच्या या दोन पंतप्रधानांना आणि देश बांधवांना सावरकर या नावाची ताकद कळली. मात्र त्यांच्या वंशजाला आणि सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाला सावरकर समजले नाहीत हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत जनावळेंनी राहुल गांधींवर शरसंधान साधलं.

झारखंडमधील विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल यांनी केलेल्या विधानाबद्दल राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली. त्यावर माझं नाव राहुल गांधी आहे. राहुल सावरकर नाही. त्यामुळे माफी मागणार नाही, असा पवित्रा राहुल यांनी घेतला. राहुल यांचं हे विधान सावरकरांचा अपमान असल्याचं म्हणत भाजपानं त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार असल्यानं हा मुद्दा अधिवेशनातही चर्चेचा ठरला आहे. 
 

Web Title: shiv sena workers sends mazi janmathep book to congress leader rahul gandhi after his comment on veer savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.