Uddhav Thackeray Met Sharad Pawar: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत हेदेखील उपस्थित असल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि महाविकास आघाडीचं ऐक्य यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्याचे समजते.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आम्हाला मित्रपक्षांची मदत झाली नसल्याचं सांगत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आगामी निवडणुकांत स्वबळावर लढावं, असा सूर आळवला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत बिघाडी होणार की काय, अशी चर्चा जोर धरत होती.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज शरद पवारांची भेट घेतल्याने मविआतील कुरबुरी दूर होईन पुन्हा एकदा तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.