Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे-एकनाथ शिंदेंची भेट होताच उद्धवसेनेने घेतला मोठा निर्णय; स्वीकृत नगरसेवक ठरले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 22:13 IST

Thackeray Group BMC News: उद्धवसेनेच्या तीनपैकी एका स्वीकृत नगरसेवकपदासाठी मनसे आग्रही होती.

Thackeray Group BMC News: मुंबई महानगरपालिका निवडणूक झाली असली तरी अद्यापही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. महापौर-उपमहापौर, समित्या सदस्य निवडीनंतर आता स्वीकृत नगरसेवकांच्या निवड प्रक्रियेला वेग येताना पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जात भाजपा, शिंदेसेना महायुतीविरोधात निवडणूक लढवली. यानंतर उद्धवसेनेने स्वीकृत नगरसेवकांसाठी मनसेला एक जागा सोडावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, उद्धवसेनेने सर्व स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळाली आहे. 

कल्याण-डोंबिवलीत मनपात मनसेने शिंदेसेनेला पाठिंबा दिला. तर चंद्रपुरात उद्धवसेना भाजपासोबत गेली. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. उद्धवसेनेसोबत युती केल्यानंतर प्रथमच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचे अवघे काही तास उलटताच उद्धवसेनेने स्वीकृत नगरसेवकांची नावे ठरवल्याचे समजते. 

मुंबई मनपा उद्धवसेनेचे स्वीकृत नगरसेवक ठरले?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी उद्धवसेनेने त्यांच्या कोट्यातून एक स्वीकृत नगरसेवकपद मनसेला देण्याची मागणी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून तीन जणांची नावे स्वीकृत नगरसेवक म्हणून निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. उद्धवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धवसेनेने ६५, तर मनसेने ६ जागा जिंकल्या. भाजपाला ८९ आणि शिंदेसेनेला २९ जागांवर यश मिळाले. या संख्याबळाच्या जोरावर भाजपाला ४, शिंदेसेनेला २, काँग्रेसला १ आणि उद्धवसेनेला ३ स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लावता येतील. उद्धवसेनेला मिळालेल्या तीनपैकी एका स्वीकृत नगरसेवकपदासाठी मनसे आग्रही होती. परंतु, उद्धव ठाकरेंनी तिन्ही जागांसाठी नावे निश्चित केल्याचे म्हटले जात आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena's big decision after Raj Thackeray-Shinde meet; councilors finalized?

Web Summary : Following Raj Thackeray's meeting with Eknath Shinde, Uddhav Sena finalized its nominated councilors for Mumbai Municipal Corporation, rejecting MNS's request for a seat. Sainath Durge, Madhuri Manjrekar, and Kailas Pathak are reportedly confirmed.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६मुंबई महानगरपालिकाउद्धव ठाकरेराज ठाकरेशिवसेनामनसेएकनाथ शिंदे