त्रिशंकू निकाल लागलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये अनेक नाट्यमय घडामोडींनंतर उद्धवसेनेने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपाच महापौर बसला होता. दरम्यान, राज्याच्या राजकारणात भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या उद्धवसेनेने चंद्रपूरमध्ये महापौरपदासाठी भाजपाला पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धवसेना आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच पाठिंब्याच्या मोबदल्यात उद्धवसेनेच्या नगरसेवकांना प्रत्येकी १ कोटी रुपये दिले गेल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला.
विदर्भातील चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. ६६ सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूरच्या महानगरपालिकेत काँग्रेसला २७ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसच्या मित्रपक्षाने ३ जागा जिंकल्या होत्या. मात्र निर्णायक बहुमताने काँग्रेसला हुलकावणी दिली होती. दुसरीकडे भाजपालाही २३ जगांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे ६ जागा जिंकणारी उद्धवसेना येथे किंगमेकरच्या भूमिकेत होती. पण मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेवरून सुरू झालेली गटबाजी अखेरपर्यंत न थांबल्याने उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपासोबत संधान बांधून भाजपाला पाठिंबा दिला होता. तसेच या पाठिंब्याच्या जोरावर भाजपाचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेत बसला होता.
आता या मुद्द्यावकरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मला माझ्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्तास्थापनेसाठी चंद्रपूरमध्ये उद्धवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येकी एकेक कोटी रुपये दिले गेले आहेत. त्याशिवाय त्यांना इतरही ऑफर देण्यात आल्या आहेत. तर अपक्ष नगरसेवकांना ५० लाख रुपये देण्यात आले आहेत, असा दावाही देशपांडे यांनी केला.
संदीप देशपांडे यांनी यावेळी उद्धवसेना आणि उद्धवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. चंद्रपूरबाबत राऊतांना अंधारात ठेवलं की त्यांनीच डोळ्यांवर पट्टी बांधली? असा सवाल त्यांनी विचारला. यावेळी संजय राऊत यांच्यावर टीकास्र सोडताना संदीप देशपांडे म्हणाले की, तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरॅक्टर ढिला, असा राऊतांचा खाक्या आहे. संजय राऊतांची अशा प्रकारची वागणूक बरी नाही. तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता तर तुम्ही काँग्रेससोबत बसायला पाहिजे होतं. मग तुम्ही भाजपासोबत कसे काय गेलात. तुम्ही केलं तर चालतं आणि इतरांनी केलं की, मग राजू पाटील भाजपाला विकले गेले, हे असं झालं ते तसं झालं, असं बोलता. अशा अशा प्रकारे बोलणं योग्य नाही, असेही देशपांडे म्हणाले.