“वाढदिवस झाला, आता फडणवीस-अजितदादांनी रिटर्न गिफ्ट द्यावे”; ठाकरे गटातील नेत्याची अजब मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 15:59 IST2023-07-24T15:57:12+5:302023-07-24T15:59:00+5:30
Maharashtra Monsoon Session 2023: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, फडणवीस आणि अजितदादांकडे वाढदिवसाच्या रिटर्न गिफ्टची अजब मागणी करण्यात आली आहे.

“वाढदिवस झाला, आता फडणवीस-अजितदादांनी रिटर्न गिफ्ट द्यावे”; ठाकरे गटातील नेत्याची अजब मागणी
Maharashtra Monsoon Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यातच अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. शेतकरी प्रश्नांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस झाला. आता फडणवीस आणि अजितदादांनी रिटर्न गिफ्ट द्यावे, अशी मागणी ठाकरे गटातील एका आमदाराने केली आहे.
दोन दिवसांपूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त दोघांना सर्व स्तरातून शुभेच्छा मिळाल्या. वाढदिवसाचे निमित्त साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट देण्याची मागणी केली आहे.
आता फडणवीस-अजितदादांनी रिटर्न गिफ्ट द्यावे
अनिल परब म्हणाले की, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा वाढदिवस होता. मात्र काही कारणास्तव दोघांनीही वाढदिवस साजरा केला नाही. संपूर्ण सभागृहाच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. दोघेही उपस्थित आहेत. आता आम्हा सर्वांना रिटर्न गिफ्ट म्हणून योग्य तो निधी द्यावा, अशी मागणी परब यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, अजित पवारांकडून देण्यात आलेल्या निधीवर शिंदे गटातील आमदारांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले आहे. आमदार भरत गोगावले यांनी याची कबुली दिली. युतीत काहीही मतभेद नसल्याचे गोगावले यांनी सांगितले.