उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 20:26 IST2025-09-22T20:19:44+5:302025-09-22T20:26:54+5:30

Thackeray Group Dasara Melava: शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याचे म्हटले जात आहे.

shiv sena thackeray group dasara melava 2025 teaser release on social media and will raj thackeray attend | उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!

उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!

Thackeray Group Dasara Melava: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू यांच्या पक्षांची युती होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा कमी झाला असून राजकीयदृष्ट्या आता हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, असे बोलले जात आहे. यातच दोन्ही ठाकरे बंधूंचे एकमेकांच्या घरी जाणे झाले, बैठका झाल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला राज ठाकरे येणार असल्याचा कयास बांधला जात आहे. दसरा मेळाव्याबाबत उद्धवसेनेकडून एक टिझर रिलीज करण्यात आला. त्यातून हे संकेत मिळत असल्याचे म्हटले जात आहे. 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मराठीच्या मुद्द्यावरुन मनोमीलन झाल्याचे चित्र आहे. दोन्ही भाऊ जवळपास २० वर्षांनी एकत्र आले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे मातोश्रीवर गेले. तर, गणपतीच्या निमित्ताने आणि राज ठाकरेंच्या मातोश्रींना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे दोनदा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले. मागील दोन महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या चार भेटीगाठी झाल्या आहेत. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती होण्याबाबत दोन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते सकारात्मक असल्याचे म्हटले जात आहे.

उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार?

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे गटाने एक टिझर जारी केला आहे. परंपरा विचारांची, धगधगत्या मशालीची, महाराष्ट्रहितासाठी होणार, गर्जना ठाकरेंची! असे कॅप्शन देऊन टिझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या टिझरमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो नाही फक्त वाक्य आहे. ते म्हणजे महाराष्ट्रहितासाठी होणार गर्जना ठाकरेंची. आता गर्जना ठाकरेंची म्हणजे उद्धव ठाकरेंची एकट्याची की ठाकरे बंधूंची ही चर्चा आता सुरू झाली आहे. 

दरम्यान, अलीकडेच झालेल्या एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ते येतील, पण माध्यमांनी जरा थांबावे.

Web Title: shiv sena thackeray group dasara melava 2025 teaser release on social media and will raj thackeray attend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.