“‘ती’ शाखा तातडीने रिकामी करा, आम्ही ताब्यात घेणारच”; अनिल परबांचा कोणाविरोधात एल्गार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:05 IST2025-01-28T16:52:30+5:302025-01-28T17:05:16+5:30
Shiv Sena Shinde Group VS Thackeray Group: ठाकरे गटाची गळती थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

“‘ती’ शाखा तातडीने रिकामी करा, आम्ही ताब्यात घेणारच”; अनिल परबांचा कोणाविरोधात एल्गार?
Shiv Sena Shinde Group VS Thackeray Group: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होऊ शकतात, असा कयास आहे. यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे सूतोवाच केले आहे. स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु, राज्यातील अन्य निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढण्याचा विचार ठाकरे गटाचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असून, पक्षातील गळती सातत्याने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्यासह मुंबई, नाशिक, कोल्हापूर सांगली तसेच जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शाखा परत करण्याबाबत राजूल पटेल यांना आव्हान दिले आहे. राजूल पटेल यांची शाखा शिवसेना ठाकरे गट ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.
‘ती’ शाखा तातडीने रिकामी करा, आम्ही ताब्यात घेणारच
अनिल परब म्हणाले की, ती शाखा आम्ही ताब्यात घेणार, मी मार खाऊन ती शाखा बांधली आणि वाचवली आहे. न्यायालयात जाऊन ती शाखा आम्ही ताब्यात घेतली होती. फक्त नगरसेविका राजूल पटेल होत्या म्हणून त्यांना ती शाखा दिली होती. या शाखेची कागदपत्रे त्यांच्या नावावर होती, आता ती आम्ही ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना सांगितले आहे, असे सांगत वर्सोव्यातील शिवसेना शाखा ६१ बाबत अनिल परब यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, वर्सोव्यातील शिवसेना शाखा २४ तासांत रिकामा करावी. अन्यथा शाखा ताब्यात घेऊ, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. राजुल पटेल या शाखेमध्ये काम करत होत्या ती शाखा ठाकरेंच्या शिवसेनेची आहे आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ती शाखा तातडीने रिकामी करावी, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.