Join us  

थापा मारून राज्य आणायचं म्हणजेच चाणक्य नीती का?; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 8:40 AM

अमित शहांच्या विधानाचा शिवसेनेकडून समाचार 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी चाणक्य नितीनं राज्य कारभार करुन जनतेची काळजी घेतात, या भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या विधानाचा शिवसेनेनं समाचार घेतला आहे. लोकांना थापा मारून पुनः पुन्हा राज्य आणायचं याच नीतीला ‘चाणक्य’नीती म्हणायचं असंल तर कसं व्हायचं?, असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा रविवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी 'आर्य चाणक्य-जीवन आणि कार्य: आजच्या संदर्भानं' या विषयावर बोलताना पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. मोदी चाणक्यांच्या सिद्धांतानुसार चालतात आणि जनतेची काळजी घेतात, असं शहा म्हणाले. शहांच्या या विधानाचा शिवसेनेनं 'सामना'मधून समाचार घेतला आहे. लोकांना थापा मारुन राज्य आणायचं याच नीतीला चाणक्य नीती म्हणायचं का? असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे. मोदींच्या भाषणांवरही शिवसेनेनं निशाणा साधला आहे. 'उत्तर प्रदेशात नवी राजकीय समीकरणं निर्माण झाली आहेत व मोदी-शहांसाठी ही संकटांची चाहूल आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेशसारखी मोठी राज्यं उद्याचं राजकीय भविष्य ठरवणार आहेत. पण या राज्यांची मानसिकता आता बदलत आहे. बोलघेवडेपणातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक विषयांना हात घातले जातात तेव्हा सरळ दंगलींना आमंत्रण दिलं जातं. राजकारण अशा पद्धतीनंच करावं व निवडणुका जिंकाव्यात हे प्रभू श्रीरामांनी सांगितलेलं नाही. चाणक्याचेही ते सूत्र नव्हतं,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं मोदी-शहा जोडीला लक्ष्य केलं आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपानरेंद्र मोदीअमित शाह