माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 05:37 IST2025-05-24T05:35:51+5:302025-05-24T05:37:19+5:30

महापालिका, नगरविकास, गृहनिर्माण, म्हाडा, डीपीडीसीतून २ कोटीपर्यंत मदतीचा हात; निवडणुकीसाठी शिंदेसेनेची ताकद वाढणार

shiv sena shinde group will give vitamin m to former corporators funds will be provided for development works even before the elections | माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी

माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी

सुजित महामुलकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिंदेसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून, माजी नगरसेवकांना निवडणुकीपूर्वी विकास कामे करून घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. पालिकेच्या माध्यमातून २ कोटीपर्यंतची कामे तसेच नगरविकास विभाग, डीपीडीसी (जिल्हा नियोजन विकास समिती) आणि म्हाडामार्फतही निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नगरसेवकांना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिंदेसेनेकडून मुंबईत माजी नगरसेवकांना विकासकामांच्या माध्यमातून अधिक ताकद देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असून गृहनिर्माण खाते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री पदही आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अखत्यारीतील खात्यांमधून पक्षाच्या माजी नगरसेवकांना विकास निधी उपलब्ध करून त्यांचे हात अधिक बळकट करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यातून महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची ताकद वाढण्यास मदत होईल, अशी शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त होत आहे.

अधिकाऱ्याची नियुक्ती

ही विकासकामे २०१७ पूर्वीच्या नाही तर केवळ २०१७ ते २०२२ या काळातील नगरसेवकांना प्रस्तावित करण्यात येतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. पालिकेची निवडणूक नोव्हेंबर २०२५ पर्यंत होणार असे गृहीत धरून विकासकामांचे प्रस्ताव तत्काळ सादर करा, अशा सूचना शिंदे यांनी दिल्याचे सांगण्यात आले. तसेच, कामांचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी पालिकेतील एका अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याचेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या आर्थिक वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निमित्ताने प्रत्येक आमदार, खासदारासाठी प्रत्येकी ३५ कोटी रुपयांच्या निधी, अशी एकूण ९०० कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. 

पालकमंत्र्यांची मंजुरी

मुंबईत निवडून आलेले विधानसभा सदस्य, विधान परिषदेचे सदस्य तसेच निवडून आलेले खासदार आणि राज्यसभा खासदार यांच्यासाठी या निधीची तरतूद होती. त्यांनी सुचवलेल्या कामांसाठीचा निधी पालकमंत्र्यांचा मंजुरीने खर्च करण्यात आला होता.

काय आहे टार्गेट?

भाजपला आता मुंबई महापालिकेवर ताबा मिळवायचा आहे, हे सर्वश्रूत असून, किमान भाजपच्या तोडीस तोड नगरसेवक मुंबई महापालिकेत  निवडून आणण्यावर शिंदेसेनेचा भर आहे. त्यामुळेच महायुतीत किमान १०० जागा लढून त्यातील अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचे टार्गेट शिंदेसेनेने ठेवले आहे. यासाठीच शिंदे यांनी मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. गुरुवारी शिंदे यांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामाची स्वतः पाहणी केली, तर बुधवारी माजी नगरसेवकांची दोन टप्प्यांत बैठक घेत त्यांना विकास कामांना निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिल्याचे समजते.
 

 

Web Title: shiv sena shinde group will give vitamin m to former corporators funds will be provided for development works even before the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.