Join us

“गाव तेथे नवी एसटी धावणार, ५ वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेणार”: प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:22 IST

Shiv Sena Shinde Group Minister Pratap Sarnaik News: भविष्यात गाव तिथे एसटी आणि मागेल त्याला बस फेरी! आपण देऊ शकतो, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

Shiv Sena Shinde Group Minister Pratap Sarnaik News: एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५ हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षांत २५ हजार नव्या  लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलवली होती. यामध्ये एसटीच्या सद्यस्थितीची परिस्थिती मंत्री सरनाईक यांनी विशद केली. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या  १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी असा प्रस्ताव मांडला. अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली असून त्याबद्दल त्यांचे प्रताप सरनाईक यांनी आभार मानले.

गाव तिथे एसटी... मागेल त्याला बस फेरी..!

प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन. २०२९ साली या २५  हजार बसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे ३०  हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल भविष्यात "गाव तिथे एसटी... मागेल त्याला बस फेरी..!" आपण देऊ शकतो. आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी  २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटी वर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे. याबद्दल मी  त्यांचा शतश: आभार आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, एसटीच्या भाडेवाढीवरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे. मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी? मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दरवाढ विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? अधिकारी जर खाते चालवतात, हा पोरखेळ आहे. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? अंगलट आला की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगल काही झाले की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे, या शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.

 

टॅग्स :एसटीप्रताप सरनाईकअजित पवारराज्य सरकारमहायुती