Join us

प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:55 IST

Shiv Sena Shinde Group Minister Pratap Sarnaik Purchase First Tesla Model Y Car: देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा मान मिळाल्याचा अभिमान आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. प्रताप सरनाईकांनी घेतलेल्या Tesla Model Y कारची किंमत किती?

Shiv Sena Shinde Group Minister Pratap Sarnaik Purchase First Tesla Model Y Car: जगातील श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर असलेल्या इलॉन मस्क यांच्या मालकीच्या बहुचर्चित टेस्ला कार कंपनीचे पहिले शोरुम मुंबई बीकेसीत खुले झाले. यानंतर देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा मान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी पटकावला आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना माहिती दिली. देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार, असा निर्धार प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर प्रताप सरनाईकांनी टेस्लाची कार खरेदी केली.

टेस्लाची इलेक्ट्रिक कार मुंबईत लॉन्च झाली आहे आणि ती घेण्याची मला संधी उपलब्ध करून देण्यात आली. आपल्या राज्यातील रस्त्यांवर अशा इलेक्ट्रिक कार कशा येतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी ही कार घेऊन आनंदी झालो आहे. महत्त्वाचे म्हणजे ही टेस्ला कार कोणतेही डिस्काऊंट न देता पूर्ण पैसे भरून मी विकत घेतली आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच टेस्लाची ही कार मी माझ्या मुलाला नाही तर माझ्या नातवाला देत आहे, कारण तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि सर्वांना पर्यावरणपूरक कारचा संदेश देईल, असे प्रताप सरनाईक म्हणाले. दरम्यान, जगातील अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून टेस्ला ओळखली जाते.

प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार

टेस्ला ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीच्या मुंबईतील शोरूमचं उद्घाटन केले आहे. ही चांगली कार आहे. या कंपनीची पहिली कार खरेदी करण्याचा मान मला मिळाला. देशातील पहिली टेस्ला कार महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्याच्या मालकीची आहे याचा मला अभिमान आहे. ही कार मी माझ्या नातवाला भेट देत आहे. ही कार घेऊन त्याला शाळेत पाठवले जाईल. त्यावेळी इतर मुले ही कार पाहतील. इतर मुलांमध्ये जनजागृती होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतू, समृद्धी महामार्गासह प्रत्येक ठिकाणी सूट देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या कंपन्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. इलेक्ट्रिक वाहने पुढील १० वर्षांमध्ये आपल्या राज्यात क्रांती घडवून आणतील. या वाहनांना प्रोत्साहन मिळावं हीच आपल्या पंतप्रधानांची इच्छा आहे. त्यासाठी आपले राज्य शासन काम करत आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

प्रताप सरनाईकांनी घेतलेल्या Tesla Model Y कारची किंमत किती?

टेस्लाच्या Model Y च्या RWD व्हर्जनची किंमत ₹६१.०७ लाख असून, LR RWD व्हर्जनसाठी ही किंमत ₹६९.१५ लाख इतकी आहे. यानंतर आपल्या आवडीचा रंग हवा असल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. भारतात ही कार पूर्णपणे आयात (CBU) करून आणली जात असल्यामुळे किंमतीत वाढ झालेली आहे. Model Y ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि जगभरात सर्वोच्च विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे.

- टेस्ला कंपनीची 3RWD या मॉडेलची कार अवघ्या ५.६ सेकंदात शून्य ते १०० इतका वेग गाठू शकते.

- Tesla 3 LR RWD ही कार एकदा चार्ज केल्यानंतर ६२२ किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते.

- टेस्लाची स्टँटर्ड RWD व्हर्जनची कार एकदा चार्ज केल्यानंतर ५०० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते.

- नवीन Model Y मध्ये बाह्य व आतील रचनेत बदल करण्यात आले असून, आता मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फंक्शनदेखील देण्यात आले आहेत.

- Model Y ची स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7, आणि Mercedes-Benz EQA यांच्याशी होणार आहे. 

टॅग्स :प्रताप सरनाईकटेस्लाएलन रीव्ह मस्कशिवसेनामुंबईइलेक्ट्रिक कारइलेक्ट्रिक कार / स्कूटर