Join us
Daily Top 2Weekly Top 5

Padma Awards 2022: “काहो फडणवीसजी, तुमच्या मोदी सरकारला बाळासाहेबांना पद्म पुरस्कार द्यावासा का वाटला नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 17:00 IST

Padma Awards 2022: मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी, असे संजय राऊत म्हणाले.

मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2022) घोषणा केली. यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना पद्म पुरस्कार का दिला नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोदींपासून शाहांपर्यंत अनेक नेतेमंडळींनी ट्विटरवरून अभिवादन केले. पण सोनिया गांधी, प्रियांका आणि राहुल गांधी अभिवादनाचे साधे ट्विट केले नाही. आघाडीत असूनही त्यांनी अभिवादन केले नाही. आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो, त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून ट्विट करून दाखवा. तरीही तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही. ज्यांना बाळासाहेबांना अभिवादन करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत तुम्ही आहात अन् वर आम्हाला ज्ञान पाजळता, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

तुमच्या मोदी सरकारला बाळासाहेबांना पद्म पुरस्कार द्यावासा का वाटला नाही

महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार हे आधीच ठरले आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त गांधी कुटंबियांनी ट्विट केले नाही याचे फडणवीसांना फार वाईट वाटले आहे. मग तुमच्या केंद्रातील सरकारला बाळासाहेबांना एखादा पद्म विभूषण पुरस्कार द्यावासा का वाटला नाही, याचा त्यांनी खुलासा केला तर आम्हाला प्रतिक्रिया देणे सोप जाईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. 

दरम्यान, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासह राज्यातील तीन लोकांना पद्म पुरस्कार मिळाला आहे. या तिघांनीही पद्म पुरस्कार नाकारला आहे. पुरस्कार देताना त्यांना विचारणा झाली नसेल. हल्ली उठसूट कोणालाही पद्म पुरस्कार दिले जातात. त्यामुळे पुरस्कार नाकारले जातात, हे चित्र बरोबर नाही. अनेकांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत. जिवंतपणी तुम्ही त्यांची किंमत करत नाही. बालाजी तांबे यांना गेल्या सात वर्षांमध्ये पुरस्कार का देण्यात आला नाही? या व्यक्ती हयात असताना त्यांना पुरस्कार का देण्यात आले नाहीत. पण मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी, असे संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :केंद्र सरकारबाळासाहेब ठाकरेनरेंद्र मोदीसंजय राऊतदेवेंद्र फडणवीस