Shiv Sena offers two crores to Gautam Gaikwad for withdrawal of nomination | माघार घेण्यासाठी गौतम गायकवाड यांना शिवसेनेची दोन कोटींची ऑफर
माघार घेण्यासाठी गौतम गायकवाड यांना शिवसेनेची दोन कोटींची ऑफर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चाललेल्या उलतापालथी पाहता, यंदाचा निकाल अनपेक्षित लागणार असल्याचे दिसून येत आहे. यंदा पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे, त्यामुळे अपेक्षादेखील वाढल्या आहेत. अशात आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घ्यावी, म्हणून शिवसेनेने दोन कोटी रुपयांची आॅफर दिली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गौतम गायकवाड यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी वरळी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.


यंदा पहिल्यांदाच शिवसेनेकडून ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरेवरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात वंचितने माजी पोलीस अधिकारी गौतम गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, गायकवाड यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी ठाण्यातून त्यांना एक फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन दोन कोटी रुपयांची आॅफर दिली होती,
असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.


गायकवाड यांनी सांगितले की, उमेदवारीचा अर्ज भरल्यासून शिवसेना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे. आनंद दिघे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून दोन कोटी रुपयांची आॅफर दिली होती. याबाबत गौतम यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर संशय असल्याचे सांगितले आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या मतदारसंघातून अन्य पक्षांसह राज ठाकरेंनीही आपला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे तुम्ही माघार घ्या, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली होती, असेदेखील त्यांनी सांगितले.


‘राजकीय स्टंट’ असण्याची शक्यता
शिवसेनेकडून असे प्रकार होऊ शकत नाहीत, याची खात्री आहे. मतदानाचा दिवस जवळ आला की, विरोधक प्रत्येक वेळी काही ना काही राजकीट स्टंट करत असतात. हा प्रकारदेखील राजकीय स्टंट असण्याची शक्यता आहे. निवडणुकीत कायम असे आरोप-प्रत्यारोप होत असतात. या प्रकरणाला जर काही कायदेशीर आधार असेल, तर संबंधित यंत्रणा त्याची नोंद घेतील.
- सुनील शिंंदे, विद्यमान आमदार, वरळी विधानसभा मतदारसंघ


Web Title: Shiv Sena offers two crores to Gautam Gaikwad for withdrawal of nomination
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.