Shiv Sena leaders Sanjay Raut slams bjp devendra fadnavis | शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

ठळक मुद्देस्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.'आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही' शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो शिवतीर्थावर येईल - राऊत

मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. 'स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला!' असं म्हणत फडणवीस यांनी व्हिडिओ ट्विट करुन आदरांजली वाहिली आहे. स्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही' असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवार) सातवा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. 'बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना वचन दिलं आहे. ते पूर्ण होणार आहे. बाळासाहेबांसाठी काहीही करू. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो शिवतीर्थावर येईल' असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण करून राऊत यांनी अभिवादन केलं आहे. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही असा टोला फडणवीस यांना लगावला आहे. शिवसेनेकडूनही बाळासाहेबांना व्हिडीओतूनच आदरांजली वाहण्यात आली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही भाग दिसून येतो. ज्यामध्ये बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वाट्टेल ते करेन, असे उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत.   

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, माजी मुख्यमंत्र्यांनी अलगदपणे शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवणच बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी करून दिल्याचं दिसून आलं. आता, शिवसेनेनंही फडणवीसांच्या ट्विटला हेरूनच उद्धव ठाकरेंच्या शब्दात प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेच्या ट्विटर अकाऊंटवरुन बाळासाहेबांना आदरांजली वाहताना एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण आणि भावना आहेत. त्या व्हिडिओतून मी वाट्टेल ते करीन, पण बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करेन. विधानसभेवर भगवा फडकवीन, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओला शिवसेनेनं जशास तसं उत्तर दिलंय, असंच म्हणावं लागेल.

 

Web Title: Shiv Sena leaders Sanjay Raut slams bjp devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.