Join us

...तर मुंबई महापालिकेची FD तोडावी लागेल; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 18:46 IST

मुंबईकरांना लुटायचे काम खोके सरकार करतायेत. प्रशासक आदेश कुणाकडून घेतायेत मुख्यमंत्री की सुपर सीएमकडून? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. 

मुंबई - निवडणुकांसाठी लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायची. २५ वर्षापूर्वी मुंबई महापालिका तोट्यात होती. आम्ही महापालिकेत चांगले काम केले त्यामुळे महापालिका नफ्यात आहेत. पैसा नीट वापरून आम्ही लोकांना सोयीसुविधा दिल्या. मात्र आता जसं काम सुरू आहे ते पाहता मुंबई महापालिकेची FD तोडावी लागेल. त्यामुळे मुंबईकर जनता तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला आहे. 

आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेवरून भाजपा-शिंदे सरकारवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले की, पैसे काढणे, मुंबईला लुटणे, महाराष्ट्राला लुटणे हे काम राज्य सरकार करतेय. अधिवेशनात अनेक घोटाळे बाहेर काढले पण निर्लज्जपणे राज्य कारभार सुरू आहे. कुणाचाही राजीनामा घेतलेला नाही. ऑगस्टमध्ये खोके सरकारने मुंबईच्या रस्त्यांसाठी ५ हजार कोटींचे रस्त्याचे टेंडर काढले. त्याला कुठलाही प्रतिसाद आला नाही. पुन्हा हे टेंडर मागे घेतले आणि नव्याने टेंडर काढलं असं त्यांनी सांगितले. 

काय आहेत आरोप?मुंबईतील ४०० किमी रस्त्यांचे ६ हजार ८० कोटी रुपयाला क्रॉंक्रिटीकरणाचे टेंडर काढण्यात आले आहे. हे टेंडर काढताना काही प्रमुख गोष्टी निदर्शनास येतात. मुंबईत काम करण्याचा सीझन हा १ ऑक्टोबर ते ३१ मे असतो. पावसाळ्यात कामे होत नाहीत. काही दिवसांपूर्वी हे टेंडर काढले जर आता फेब्रुवारी महिन्यात वर्क ऑर्डर काढली तर ती होतील की नाही याची कल्पना नाही. ४०० किमी रस्ते खोदून ठेवणार त्याची कामे कधी होणार? वेगवेगळ्या एजन्सीसोबत समन्वय साधावा लागतो. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मुंबईचे रस्ते किती, कसे काम केले जाते हेदेखील माहिती नाही असं आदित्य ठाकरेंनी सांगितले. 

प्रशासकाला अधिकार दिला कुणी?नोव्हेंबर डिसेंबरमध्ये शेड्युल्ड ऑफ रेट मुंबई महापालिकेने बदललं. त्यानंतर अंदाजित रक्कम २० टक्क्यांनी वाढवली. टेंडरमुळे कंत्राटदारांना ४० टक्के फायदा होणार आहे. जीएसटी रेट वगळून टेंडर काढले आहेत. महापालिकेत महापौर, लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाला एवढा अधिकार दिला कुणी? या प्रक्रियेत गैरव्यवहार झाला नाही का? हा मुंबईकरांच्या हक्काचा पैसा असतो. मुंबईकरांना लुटायचे काम खोके सरकार करतायेत. प्रशासक आदेश कुणाकडून घेतायेत मुख्यमंत्री की सुपर सीएमकडून? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. 

मुंबईची लूटमार करायची अन् जनतेला लुटायचं धोरणमहिनाभरापूर्वी फिल्मसिटीबद्दल २२५ कोटींचे टेंडर काढायला मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला सूचना केली. परंतु फिल्मसिटी ही वेगळी संस्था आहे महापालिका अख्यारित्य नाही. महापालिकेचा पैसा दुसऱ्या संस्थेला देऊ शकतात का? ठाण्यात ७ वर्ष पालकमंत्री, नगरविकास मंत्री, MSRDC खाते असताना तेथील रस्ते चांगले का केले नाहीत? केवळ मुंबईवर राग ठेवला जातोय. पद्धतशीरपणे मुंबईची लूट चालली आहे. डोळे उघडून खोके सरकार भांडणात लोकांना व्यस्त ठेवत आहे. मुंबईची लूटमार करायची. मुंबईचे रस्ते खोदून ठेवायचे आणि जनतेला त्रास द्यायचा हे धोरण सरकारचं आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. 

राज्यपालांवर कारवाई नाहीगेल्या ६ महिन्यात राज्यात मोगलाई आल्यासारखं वाटतंय. स्थानिक गद्दार आमदार यांनी गणपतीच्या सणामध्ये गोळीबार केला. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. धक्काबुक्की, शिवीगाळ असे अनेक प्रकरणे झाली पण कुणावरही कारवाई नाही. स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके या धोरणावर सरकार सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमानाबद्दल बोलूनही राज्यपालांवर कारवाई नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदेभाजपामुंबई महापालिका निवडणूक २०२२