Join us  

जवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात नाहीत; शिवसेनेचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 7:31 AM

मेजर शशीधरन नायर यांच्या हौतात्म्यावरुन शिवसेनेचं शरसंधान

मुंबई: आमचे तरुण लष्करी जवान जम्मू-कश्मीरमध्ये रोज मरत आहेत. या जवानांची छाती किती इंचांची ते माहीत नाही, पण ते कोणतंही रडगाणं न गाता लढत आहेत, अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. पुण्याचे रहिवासी असणारे मेजर शशीधरन नायर यांना नौशेरा सेक्टरमध्ये वीरमरण आलं. त्यावरुन शिवसेनेनं मोदींवर शरसंधान साधलं आहे. काँग्रेसचं राज्य असतानाही जवान लढत होते व आता मोदींचे राज्य आले तरीही त्यांची लढाई व हौतात्म्य संपलेलं नाही. चौकीदारानं याची दखल घेतली पाहिजे, असा सल्लाही शिवसेनेनं सामनामधून दिला आहे. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी दोन भयंकर स्फोट घडवले. त्यात मेजर शशीधरन नायर यांनी हौतात्म्य पत्करलं. मेजर साहेबांना अंतिम निरोप देण्यासाठी मोठी गर्दी होती. त्यांनी मेजरसाहेबांच्या नावानं ‘अमर रहे’च्या घोषणा दिल्या. ‘पाकिस्तान मुर्दाबाद, भारतमाता की जय’च्या घोषणा दिल्या. ‘वंदे मातरम्’चाही गजर झाला. मेजरसाहेबांचा देह मातीत विलीन झाला. ही जगरहाटी अशीच वर्षानुवर्षे सुरू आहे. जम्मू-कश्मीरमध्ये आपण आजपर्यंत देशाचे अनेक तरुण सुपुत्र गमावले व गमवत आहोत. त्यानंतर शोक व्यक्त करणे, अश्रू ढाळणे व बदला घेण्याच्या पोकळ वल्गना करणे यापेक्षा अनेक वर्षांत काय घडले?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. मेजर शशीधरन व त्यांचे वीर साथी सीमेवर पाकड्यांशी लढत होते तेव्हा आमचे राज्यकर्ते म्हणवून घेणारे काय करत होते? रामलीला मैदानावर सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींसह बरेच मंत्री-मुख्यमंत्री हजर होते व 2019 साली पुन्हा मजबूत सरकार आणण्याचं भाषण ठोकत होते. याचा अर्थ काय घ्यायचा? 2014 साली संपूर्ण बहुमताचं सरकार मोदींनी स्थापन केलं ते मजबूत नव्हतं काय? ते ‘पोकळ’ होतं काय? असं साडेचार वर्षांनंतर सांगणं हा मतदारांनी दिलेल्या बहुमताचा अपमान आहे. 2014 मध्ये तुम्हाला जनतेनं पूर्ण बहुमताचं सरकार दिले, मात्र याच चार वर्षांच्या काळात कश्मीर खोऱ्यातील स्थिती जास्त चिघळली व रक्ताचे पाट वाहिले. काल मेजर शशीधरन यांच्या बलिदानानंतर पुन्हा कश्मीरातील रक्तपाताचा प्रश्न उभा राहिला, अशा शब्दांमध्ये शिवसेनेकडून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या काश्मीर धोरणावर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं आहे.श्री. मोदी यांनी रामलीलावरील भाषणात सांगितलं की, ‘‘काँग्रेसने मला छळलं!’’ स्वतःचं दुखणं बाजूला ठेवून देशाचे दुखणं दूर करतो तो राज्यकर्ता. पाकिस्तान छळत आहे व त्या छळात आमच्या जवानांचं बलिदान होत आहे ते आधी बघा. ‘‘चौकीदार एकालाही सोडणार नाही!’’ असंही पंतप्रधान म्हणतात. बरोबर आहे, एकालाही सोडू नका. त्याआधी पाकिस्तानला सोडू नका. आमचे तरुण लष्करी जवान जम्मू-कश्मीरमध्ये रोज मरत आहेत. या जवानांची छाती किती इंचांची ते माहीत नाही, पण ते कोणतंही रडगाणं न गाता लढत आहेत. काँग्रेसचं राज्य असतानाही लढत होते व आता मोदींचं राज्य आलं तरीही त्यांची लढाई व हौतात्म्य संपलेलं नाही. चौकीदारानं याची दखल घेतली पाहिजे, असा सल्ला मोदींना देण्यात आला आहे.वीर जवानांना श्रद्धांजली वाहणं व मानवंदना देणं हा आता एक ‘राष्ट्रीय’ कार्यक्रम झाला आहे. वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात ज्यांना अभिमान आणि गर्व वाटतो त्या राज्यकर्त्यांनी शहीद मेजर शशीधरन नायर यांच्या घरी जाऊन त्यांची माता, पत्नी व बहिणीचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. रडगाणं व आक्रोश यातला फरक जेव्हा कळेल तो सुदिन. मेजर शशीधरन माफ करा, जवानांचे बलिदान तसं व्यर्थच जात आहे. वीर जवानांनो, माफ करा, अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं मोदींच्या काश्मीर धोरणावर आसूड ओढले आहेत. 

टॅग्स :नरेंद्र मोदीशहीदभारतीय जवानजम्मू-काश्मीरपाकिस्तानउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा