Join us

आता सावज दमलंय, भाजपाची शिकार स्वतः करणार; उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 07:46 IST

पुढील निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे संकेत उद्धव यांनी मुलाखतीमधून पुन्हा एकदा दिले

मुंबई: सावजाची शिकार मीच करीन. त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही. पण आता बंदुकीची गरज लागणार नाही. सावज दमलंय, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढवला. उद्धव यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला प्रदीर्घ मुलाखत दिली. त्यात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं. सावजाची शिकार मीच करेन, त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही, असं म्हणत उद्धव यांनी भाजपासोबतच्या युतीच्या चर्चेवर पडदा टाकला. यासोबतच अन्य पक्षांसोबतही जाणार नाही, हेदेखील स्पष्ट केलं. पुढील निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे संकेत उद्धव यांनी मुलाखतीमधून पुन्हा एकदा दिले. 'माझ्या खांद्यावर नाही, तर हातात बंदूक आहे. दुसऱ्याची बंदूक मी माझ्या खांद्यावर ठेवू देणार नाही,' असं म्हणत भाजपाला पराभूत करण्यासाठी इतर पक्षांसोबत जाणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी मुलाखतीतून स्पष्ट केलं. काही वेळा सावजावर गोळी मारण्याची गरज नाही. ते पळून पळून पण पडू शकेल, अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी भाजपाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. कुणावर सूड उगवण्यासाठी मी राजकारण करत नाही, असंदेखील ते म्हणाले. त्यांनी या मुलाखतीत हिंदुत्वाच्या मुद्यावरुनही भाजपावर निशाणा साधला. हिंदुत्वाच्या नावावर सध्या देशभरात सुरू असलेला उन्माद मला मान्य नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख या मुलाखतीत म्हणाले. 

गोमांसाच्या मुद्यावरुन माणसं मारली जातात. गाईसाठी जीव घेतले जातात. मात्र या देशात महिला सुरक्षित नाहीत, असं म्हणत उद्धव यांनी कथित गोरक्षकांवर सडकून टीका केली. 'गाईंची सुरक्षा करताना आपला भारत हा स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित देश बनला आहे. याची खरं तर लाज वाटायला पाहिजे. गोमाता वाचली पाहिजे. पण माझी माता? तिचं काय?,' असे सवाल उपस्थित महिलांच्या सुरक्षेवरुन त्यांनी सरकारला धारेवर धरलं. 'महिलांना न वाचवता तुम्ही गाईचं मांस खाल्लं का, याच्यामागे लागणार असाल, तर हे सगळं थोतांड आहे. हे हिंदुत्व नाही,' असा घणाघाती हल्ला उद्धव यांनी मोदी सरकारवर चढवला. 

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेनानरेंद्र मोदी