Join us

...तर पाशवी वृत्ती संपूर्ण देश खाऊन टाकेल; उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 14:43 IST

गुलामगिरी ही गुलामगिरीच असते. मग ती स्वकियांची असेल किंवा परकियांची असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मुंबई - लोकशाहीच्या ४ स्तंभात माध्यम हा महत्त्वाचा स्तंभ आहे. बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकली. एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते? म्हणजे आम्ही वाटेल ते करू पण तुम्ही आवाज उचलायचा नाही. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू. ही पाशवी वृत्ती आज आपल्या देशात फोफावायला बघतेय. ही आपण वेळेवर एकत्र आलो नाहीत आणि ताकद वाढवली नाही तर संपूर्ण देश खाऊन टाकेल अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर घणाघात केला आहे. 

रायगड जिल्ह्यातील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना भवन इथं ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, मी उत्तर भारतीयांच्या एका कार्यक्रमात गेलो होतो. तेव्हा म्हटलं होते की, त्यावेळची लढाई स्वातंत्र्याची होती. आता हे स्वातंत्र्य टिकवण्याची लढाई आहे. स्वातंत्र्य टिकवायचं कारण गुलामगिरी ही गुलामगिरीच असते. मग ती स्वकियांची असेल किंवा परकियांची. आता वंदे भारत, वंदे मातरम या घोषणा दिल्या जातायेत. पंतप्रधान उद्धाटन करतायेत. झेंडे दाखवले जातायेत. पण त्याचवेळी माझी भारतमाता पुन्हा गुलाम कशी होईल यादिशेने मोदींची पाऊले जातायेत. ही पाऊले ओळखून आपल्याला एकत्र आले पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तसेच रियाजशेठ सारखे हजारो मुस्लीम बांधव शिवसेनेत आले. त्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व सोडलं असं कुणी म्हणत असेल तर काही महिन्यांपूर्वी मोहन भागवत मशिदीत गेले होते त्यांनी काय सोडलं? तर दत्तात्रय होरपाळे यांनी गोमांस खाणाऱ्यांना दरवाजे बंद करता येणार नाहीत असं विधान केले होते मग त्यांनी काय सोडलं? या भानगडीत आपल्याला जायचं नाही. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व या शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीनुसार आपल्याला पुढे जायचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

दरम्यान, देशद्रोही जो कुणी असेल, मग तो कुठल्या धर्माचा असेल त्याला आमचा विरोध आहे. या विचाराने आपण एकत्र आलोय. आज हे मिळणारं बळ केवळ शिवसेनेलाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना दिलेले बळ असेल. ही आपली एकजूट महाराष्ट्राला तसेच देशाला दिशा दाखवणारी असेल असा विश्वासही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. रायगड काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रियाजशेठ बुबुरेंनी समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला. 

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीभाजपा