Join us

Maharashtra Political Crisis: “हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा”; उद्धव ठाकरेंचे शिंदे सरकारला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 17:22 IST

Maharashtra Political Crisis: विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार तात्पुरते आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी, हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणुका घेऊ दाखवा, असे आव्हान दिले. 

शिवसेना भवनात जिल्हा प्रमुख यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु

उद्धव ठाकरेंनी यावेळी घटनातज्ज्ञांना विनंती केली. ते म्हणाले की, आपण घटनातज्ज्ञ आहात. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा, असे आवाहन करत, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

दरम्यान, शिवसेना कधीही संपणार नाही. शिवसेना दुपटीपेक्षाही जास्त ताकद घेऊन विधानभवनात येईल आणि भगवा फडकवेल, असा विश्वास शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. २० मे रोजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्याबाबत विचारले होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. पक्षाचा व्हीप मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याच येईल, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. बंडखोर जेव्हा लोकांना भेटतील तेव्हा पाहू, जनतेचा सामना कसा करातात पाहू, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस