Join us  

गोंधळाच्या गर्तेत देश गटंगळ्या खातोय! लॉकडाऊन, कोरोनावरून शिवसेनेचा केंद्रावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 7:53 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चला फक्त चार तासांच्या मुदतीवर कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्या दिवसापासून सुरू झालेला गोंधळ आणि अनिश्चितता आजपर्यंत कायम आहे. एवढा गोंधळ कधीच झाला नव्हता.

ठळक मुद्देशावर आर्थिक संकट कोसळले आहे आणि केंद्र सरकारने सरळसरळ हात झटकले आहेत लॉकडाऊनच्या काळात सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. पण हा पैसा कधी व कोणापर्यंत पोहोचला हे रहस्यच आहेकेंद्र सरकारने जागतिक बँकेकडून मोठे कर्ज घ्यावे आणि राज्यांची गरज भागवावी

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशासमोर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थाही अडखळली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशात निर्माण झालेल्या मोठ्या आर्थिक संकटावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चला फक्त चार तासांच्या मुदतीवर कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्या दिवसापासून सुरू झालेला गोंधळ आणि अनिश्चितता आजपर्यंत कायम आहे. एवढा गोंधळ कधीच झाला नव्हता. त्या गोंधळाच्या गर्तेत देश गटंगळ्या खात आहे, कसे व्हायचे, असा टोला सामनामधून मोदी सरकारला लगावण्यात आला आहे.सामनामध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात म्हटले आहे की, देशावर आर्थिक संकट कोसळले आहे आणि केंद्र सरकारने सरळसरळ हात झटकले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याराज्यात जे संकट निर्माण झाले आहे, ते मुख्यत्वेकरून कोसळलेल्या अर्थव्यवस्थेचे आहे. अशा परिस्थितीत केंद्राने राज्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात अशी मदत गुजरातला केली होती. केंद्राकडे स्वत:ची महसुली उत्पन्नाची साधने कमी आहेत. राज्यांनी दिलेल्या महसुलावर केंद्राचे दुकान चालते. पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्री, नोकरशाही, संसद, खासगी सुरक्षा, संरक्षण, परराष्ट्र व्यवहारावर होणारा अचाट खर्च हा या मार्गाने होते.काही राज्ये केंद्राला जास्त महसूल देतात. तर काही राज्ये कायम हाती कटोरा घेऊन दिल्लीत उभी राहतात. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब, गुजरात प. बंगाल, आंध्रने स्वत:च्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून केंद्राला भक्कम केले आहे. केंद्राच्या तिजोरीत किमान २२ टक्के रक्कम एकट्या मुंबईतून जाते. पण आज महाराष्ट्र आणि इतर राज्यांना मदत करायला केंद्र सरकार तयार नाही. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेशला कोरोनाचा जास्त फटका बसला आहे. ही पाच राज्येच देशाच्या जीडीपीमध्ये ४५ टक्के वाटा उचलतात. मात्र कोरोनाचा प्रकोप आणि लॉकडाऊनमुळे पाच राज्यांना १४.४ लाख कोटींचा फटका बसला आहे. पाच राज्यांत ही स्थिती असेल, तर संपूर्ण देशात किती नुकसान झाले असेल, ते आकडे धक्कादायक ठरतील. आर्थिक अराजकाच्या वणव्यात सर्व काही संपून जाईल. लॉकडाऊनच्या काळात सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. पण हा पैसा कधी व कोणापर्यंत पोहोचला हे रहस्यच आहे, असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे.महाराष्ट्राची अवस्थाही इतर राज्यांप्रमाणेच आहे. पण केंद्राने जीएसटीचे हक्काचे २३ हजार कोटी रुपये तातडीने द्यावेत, एवढीच अपेक्षा आहे. कोरोना लढाईचा खर्च वाढतच जाणार आहे. आणि केंद्राने आता मदतीचा हात आखडता घेतला आहे. वैद्यकीय उपकरांचा पुरवठा बंद करण्यात आल्याने राज्यावर ३०० कोटींचा अधिक बोजा पडणार आहे. काटकसरीचा मार्ग अवंबला तरी मोठ्या राज्यांचे गाडे पुढे सरकणे कठीणच आहे. राज्ये आधीच कर्जबाजारी असल्याने नवे कर्ज मिळणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने जागतिक बँकेकडून मोठे कर्ज घ्यावे आणि राज्यांची गरज भागवावी, हाच एक पर्याय आहे, अशा सल्लाही सामनामधून देण्यात आला आहे.देशात आर्थिक अराजक माजले त्याला नोटाबंदीसारखे घातक प्रयोग जबाबदार आहेत. देशात कोणत्याही पूर्वतयारीशिवाय लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लॉकडाऊन करताना कुणाचाच कुणाशी मेळ नव्हता. २४ मार्चला फक्त चार तासांच्या मुदतीवर कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्या दिवसापासून सुरू झालेला गोंधळ आणि अनिश्चितता आजपर्यंत कायम आहे. एवढा गोंधळ कधीच झाला नव्हता. त्या गोंधळाच्या गर्तेत देश गटंगळ्या खात आहे, कसे व्हायचे, असे या अग्रलेखात म्हटले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यालॉकडाऊन अनलॉकअर्थव्यवस्थाभारतनरेंद्र मोदीशिवसेना