Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेला अडीच वर्षे महापौर पद हवे? भाजपाकडून पहिल्यांदाच भाष्य, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 19:18 IST

BMC Mayor News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील २९ नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवले आहे. भाजपावर महापालिकेतील सत्तावाटपाच्या वाटाघाटीत दबाव आणण्यासाठी हे केलं गेलं असल्याची चर्चा आहे. 

मुंबई महापालिकेचे निकाल लागल्यानंतर राजकारण आणखी तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर अचानक २९ नगरसेवक मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहेत. मुंबईचे महापौरपद अडीच वर्षे मिळावे, तसेच महापालिकेतील महत्त्वाच्या समित्या मिळाव्यात म्हणून भाजपावर हा दबाव निर्माण केला जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहेत. याचबद्दल भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आले. महापौरपदाबद्दलचा निर्णय कसा होणार, याविषयी त्यांनी भाष्य केले. 

८९ जागा जिंकलेला भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला, तरी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदेसेनेची मदत लागणार आहे. दोन्ही पक्ष युतीत लढले. भाजपाला चांगल्या जागा मिळाल्या, तर शिंदेसेनेचे २९ उमेदवारच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. कमी नगरसेवक असले, तरी शिंदेंकडून भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

"आमचे संसदीय मंडळ आहे. तिथे जी काही मागणी आहे, ती येईल. माझ्याकडे तरी काही मागणी आलेली नाही. आमच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे हेही आहेत. आमच्या समन्वय समितीमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्रित बसून निर्णय घेतील", असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

"जर मागणी असेल (महापौरपदाची) तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतील. याबद्दल जी काही चर्चा करायची आहे, ती माध्यमांमध्ये होत नाही. पत्रकारांशी होत नसते, ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येच होईल", असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दल अधिक बोलणे टाळले. 

शिंदेसेनेच्या नगरसेवकांचा ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये मुक्काम

शिंदेसेनेचे नगरसेवक सध्या मुंबईमधील  ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये आहेत. काही नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. काही नगरसेवकांनी ठाकरेंबद्दल आमच्या मनात अनादर नाही, असेही म्हटल्याचे काही माध्यमांनी वृत्त दिले आहे. नगरसेवक फुटू नये म्हणून हॉटेलमध्ये ठेवल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबद्दल अद्याप खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही. 

दुसरीकडे मुंबई महापालिकेत महत्त्वाच्या समित्या मिळाव्यात म्हणून शिंदेसेनेचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भाजपावर आधीपासूनच दबाव टाकण्यासाठी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले गेल्याची चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena wants 2.5 years of Mayor post: BJP responds

Web Summary : Shinde Sena's demand for Mumbai Mayor post creates political pressure. BJP's Bawankule says decisions will be made jointly. Sena councilors are in a hotel amid talks of possible defection.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६शिवसेनाभाजपाएकनाथ शिंदेचंद्रशेखर बावनकुळे