Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंची प्रसिद्ध होणार 'सामना' मुलाखत; मात्र दीपक केसरकरांनी केलं महत्वाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 15:58 IST

शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

मुंबई- सामना संपादक संजय राऊत यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा टीझर प्रसिद्ध केला आहे. उद्धव ठाकरेंची ही मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. यात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरीनंतर ते स्वतः सुरतला गेले असते तर पासून विश्वासमत ठरावाला सामोरे गेले असते तर काय झालं असतं अशा अनेक प्रश्नांवर उत्तरं दिल्याचं दिसत आहे. मात्र आज शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

उद्धव ठाकरे जनतेला कितीवेळा भेटले?, मंत्रालयात कितीवेळा गेले?, असा सवालही दीपक केसरकरांनी विचारला. तसेच आमच्या एकही प्रश्नांची उत्तर त्यांनी दिलं नाही. आघाडी तोडा हे आम्ही सांगत होतो, मग कटकारस्थान केलं हे का बोलताय, असंही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

आज आमच्या खासदारांच्या घरावर मोर्चे काढले जात आहे. कुणाच्या घरावर मोर्चा काढण्याचा अधिकार कुणी दिला?, असं दीपक केसरकर म्हणाले. लोकांच्या घरावर आंदोलनं करणं आता थांबवा. राज्यातील जनतेला शांतता हवी आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका. राजकारण करा, मुलाखती द्या, पण हे कुठेतरी थांबवा, असं आवाहन दीपक केसरकरांनी केलं.   

दरम्यान, हम दो एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाये असा टोला उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या प्रश्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. माझ्या मनात काही पाप नव्हतं. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो परंतु सत्तेची चटक लागली नाही या एका गोष्टीचं माझ्या मनात समाधान आहे. मी मुख्यमंत्री होईन असं बोललो नव्हतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या बहुचर्चित मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

पहिल्या टिझरमध्ये काय होतं?

मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आणि पक्षात फूट पडली यात नेमकं काय चुकलं? महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारल्याचं टिझरमध्ये दिसून येत आहे. यात अखेरीस उद्धव ठाकरे यांनी "आता पुन्हा एकदा सामान्यांना सामान्यातून असामान्य लोक घडविण्याची वेळ आली आहे", असं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं आता शुन्यातून सुरुवात करण्याची आणि सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाण्याची तयारी सुरू केली असल्याचं उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेदीपक केसरकर एकनाथ शिंदेशिवसेनासंजय राऊत