Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मुख्यमंत्री तुम्ही नाही जनता ठरवणार"; शिंदे गटाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 09:36 IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात, धोका देणारे सच्चे हिंदू नाहीत म्हणत ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी टीका केली होती.

Shankaracharya Avimukteshwarananda : ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 'उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, त्यांना धोका देणारे खरे हिंदू नाहीत', असे विधान शंकराचार्य  अविमुक्तेश्वरानंद यांनी केले. त्यावर आता शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेतील अंतर्गत वादावर राजकीय भाष्य करणे त्यांना शोभत नाही, अशा शब्दात निरुपम यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सोमवारी मुंबईत मातोश्री गाठून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी त्यांच्या घरी पूजा करून स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी, खरा हिंदू विश्वासघात करणारा नसून सहन करणारा आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही तेच झाले, असे म्हटलं. यावरुनच आता शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री कोण होणार आणि कोण नाही हे जनता ठरणार, शंकराचार्य नाही, असे म्हटलं आहे.

"जगतगुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद जी धार्मिक कमी आणि राजकीय जास्त आहेत. उबाठा प्रमुखांना भेटणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. यावर कोणताही आक्षेप नाही. मात्र त्यांनी शिवसेनेच्या अंतर्गत वादावर राजकीय भाष्य करणे टाळायला हवे होते. ते त्यांना शोभत नाही. मुख्यमंत्री कोण होणार आणि कोण नाही हे जनता ठरवेल, शंकराचार्य नाही. वेळी ते म्हणाले की, जे लोक विश्वासघात करतात ते हिंदू असू शकत नाहीत. हा फार विचित्र तर्क आहे. सगळ्यात आधी हे ठरवावे लागेल की विश्वासघात कोणी केला? आणि शंकराचार्य हे ठरवू शकत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे, हिंदू पौराणिक कथा आणि इतिहासात विश्वासघाताची अनेक उदाहरणे आहेत. मग ते हिंदू नव्हते का? विश्वासघात हा मानवी दुर्गुण आहे. त्याचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. होय, या अवगुणामुळे एखादा चांगला किंवा वाईट हिंदू असू शकतो. पण तो हिंदू नाही, हा खोटापणा आहे," असं निरुपम यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात - शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

"आम्ही सर्वजण हिंदू धर्म व सनातन धर्म पालन करणारे आहोत. आपल्याकडे पाप-पुण्याची भावना सांगण्यात आली आहे. गोहत्या हे सर्वात मोठे पाप आहे. पण त्याहून मोठा घात हा विश्वासघात आहे. हाच घात उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाला आहे. ही वेदना अनेकांच्या मनात आहे. ही वेदना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईपर्यंत दूर होणार नाही. विश्वासघात करणारा हिंदू नसतो. पण विश्वासघात सहन करणारा मात्र निश्चितच हिंदू असतो. त्यामुळे विश्वासघात करणारे कसे हिंदू असतील? उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला. महाराष्ट्रातील समस्त जनतेला ही वेदना ठावूक आहे. निवडणुकीतही ही गोष्ट सिद्ध झाली आहे. सरकार पाडून जनमताचा अनादर करणे ही चांगली गोष्ट नाही," असं अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :उद्धव ठाकरेसंजय निरुपमएकनाथ शिंदेशिवसेना