Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीत बहुमताला महत्व, उद्धव ठाकरेंच्या गटाला न्यायालयानं चपराक दिली; शिंदे गटाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 17:51 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- शिवसेना कोणाची? पक्ष चिन्ह कोणाचे आणि शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात आज चारही बाजुंनी जोरदार युक्तीवाद केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या पाच न्यायमूर्तींची एकमेकांसोबत चर्चा केली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्याशिवसेनाला मोठा धक्का बसला आहे, तर एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. 

निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने पुढील कार्यवाही करण्यास होकार दिला आहे. यामुळे पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोग कार्यवाही करण्यास मोकळा झाला आहे. सकाळपासून शिवसेनेचा ठाकरे गट हा निवडणूक आयोगाला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. सिब्बल यांनी त्या दिशेनेच युक्तीवाद केला होता. शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरेच आहेत, निवडणूक चिन्हही त्यांच्याकडेच आहे. यामुळे निवडणूक आयोग आता यावर निर्णय घेणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाबाबत जो आज निर्णय दिला आहे. त्याबाबत मी सर्वोच्च न्यायालयाने आभार मानतो. त्यांनी केंद्रीय निवडणुक आयोग आहे, त्याचा निर्णय आहे, तो अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्व असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

५० पैकी ४० आमदार, १८ पैकी १२ खासदार, मोठ्या प्रमाणात नगरसेवक आणि ८० टक्के पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असं नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं. लोकांमध्ये एक वेगळा समज निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या गटानं हे सर्व प्रयत्न केले. मात्र आज न्यायालायाने त्यांना मोठी चपराक दिली आहे, अशी टीकाही नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंच्या गटावर केली आहे. 

दरम्यान, गेल्या काही तासांपासून ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडून युक्तीवाद सुरु आहे. शिवसेनेकडून युक्तीवाद करताना सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंच्या सदस्यत्वावरच प्रश्न उपस्थित केला होता. सिब्बल यांनी शिंदे निवडणूक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत, यावर लक्ष केंद्रीत केले होते. परंतू, खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या पारड्यात चेंडू टोलविला आहे.  

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र सरकार