Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंकडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आला नव्हता, अशोक चव्हाणांच्या दाव्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 15:23 IST

Sharad Pawar: एकनाथ शिंदेंकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता स्थापनेचा प्रस्ताव कधीच आला नव्हता. अशोक चव्हाण जे बोलताहेत त्याबाबत मी कधीही ऐकलेलं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मुंबई - २०१४ नंतर शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव देण्यात आला होता. हा प्रस्ताव घेऊन आलेल्या शिष्टमंडळामध्ये एकनाथ शिंदेसुद्धा होते, असा दावा करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता स्थापनेचा प्रस्ताव कधीच आला नव्हता. अशोक चव्हाण जे बोलताहेत त्याबाबत मी कधीही ऐकलेलं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कुठलाही प्रस्ताव दिलेला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसला तसा प्रस्ताव दिला गेला असता तर ते मला माहित असतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अन्य निर्णय घेण्याचा अधिकार अन्य लोकांना आहे. मात्र ते अशा गोष्टी कमीत कमी  माझ्या कानावर घालतात. अशोक चव्हाण जे बोलले ते मी कधीही ऐकलेलं नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

२०१४ मध्ये शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव आला होता. असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. तसेच हा प्रस्ताव घेऊन आलेल्या शिष्टमंडळामध्ये एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली होती.

टॅग्स :शरद पवारअशोक चव्हाणराष्ट्रवादी काँग्रेसएकनाथ शिंदे