अन् शरद पवार मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 07:37 AM2019-07-31T07:37:30+5:302019-07-31T07:39:11+5:30

हल्ली सभागृहात वेगळाच पायंडा पाडला जात आहे. माझ्या संसदीय व विधिमंडळातील ५२ वर्षांच्या कार्यकालात मी कधीही माझा बाक सोडला नाही.

Sharad Pawar statement on Chief Minister Devendra Fadanvis | अन् शरद पवार मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात तेव्हा...

अन् शरद पवार मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात तेव्हा...

Next

मुंबई - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानगाथा या पुस्तकाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर आले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते व्यासपीठावर एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी शरद पवार म्हणाले की, देशाच्या संसदेने, राज्याच्या विधिमंडळाने याआधी अनेक अभ्यासपूर्ण भाषणे ऐकली आहेत.

शेकाप नेते उद्धवराव पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस विषयाची चांगली तयारी करून मांडणी करत, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही अभ्यासपूर्वक मांडणी करतात असं कौतुक पवारांनी केलं. 

तसेच हल्ली सभागृहात वेगळाच पायंडा पाडला जात आहे. माझ्या संसदीय व विधिमंडळातील ५२ वर्षांच्या कार्यकालात मी कधीही माझा बाक सोडला नाही. संसदेची गरीमा सांभाळण्याची काळजी आम्ही घेतली. दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही असा टोलाही शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 

यावेळी शरद पवार म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ हे पुस्तक वाचले. अतिशय चांगले पुस्तक आहे. विधिमंडळात येणाऱ्या नव्या सदस्यांना मार्गदर्शक ठरेल, असे हे पुस्तक आहे. मी या विधिमंडळात प्रेक्षक म्हणून पहिल्यांदा आलो. प्रेक्षकांच्या गॅलरीत मी पायावर पाय ठेवून बसलो असता कर्मचाऱ्यांनी हटकले आणि बाहेर काढले. बाहेर जाताक्षणी मी शपथ घेतली की, आता बाहेर जाईन, पण पुन्हा इथे येईन.. आणि नंतर आमदार होऊन मी विधिमंडळात आलो. हर्षवर्धन यांचे चुलते शंकरराव पाटील अतिशय शिस्तबद्ध होते. हर्षवर्धन पाटील त्यांचा वारसा योग्यरीत्या चालवत आहेत, त्यांचे हे पुस्तक निश्चितच नव्या सदस्यांना प्रेरणा देणारे ठरेल, असा मला विश्वास आहे असं पवारांनी सांगितले.

दरम्यान ‘काल रात्री माझे जीभ आणि गळ्याचे ऑपरेशन झाले आहे. डॉक्टरांनी मला काही दिवस बोलू नका, कार्यक्रमांना जाऊ नका, असे सांगितले. पण, सध्याचे राजकारण पाहता मी कार्यक्रमाला गेलो नाही; तर मी गिरीश महाजन यांच्याबरोबर अमित शहा यांना भेटायला गेल्याच्या बातम्या आल्या असत्या. म्हणून थोडा त्रास झाला, तरी मी आलो,’ या शरद पवारांच्या कोटीने तर सभागृह टाळ्या आणि हशाने दणाणून गेले. 

Web Title: Sharad Pawar statement on Chief Minister Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.