मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:33 IST2025-12-29T13:32:40+5:302025-12-29T13:33:17+5:30
Rakhee Jadhav joins BJP: युती किंवा आघाडीत पक्षाला किमान ३० जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र ते प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून झाले नाही अशी त्यांची नाराजी आहे.

मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत कुणासोबत जाणार अशी चर्चा सुरू होती. ठाकरे बंधू युती आणि काँग्रेस असे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. मात्र युतीची बोलणी सुरू असतानाच दुसरीकडे भाजपाने राखी जाधव यांना पक्षात प्रवेश दिल्याने निवडणूक काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भगदाड पडलं आहे.
आमदार पराग शाह यांच्या उपस्थितीत राखी जाधव यांनी भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत २ गट पडल्यानंतरही राखी जाधव यांनी शरद पवारांच्या पक्षात राहणे पसंत केले. मात्र जागावाटपावरून झालेल्या नाराजीनाट्यानंतर राखी जाधव यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. राखी जाधव यांनी या निवडणुकीत ५२ जागांच्या उमेदवारांची यादी पक्षाकडे दिली होती. युती किंवा आघाडीत पक्षाला किमान ३० जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र ते प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून झाले नाही अशी त्यांची नाराजी आहे.
घाटकोपरमधून राखी जाधव यांना भाजपाकडून महापालिकेची उमेदवारी मिळणार आहे. जागावाटपात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कमी जागा मिळत असल्याने पक्षात नाराजी वाढली होती. त्याचाच फटका आता पक्षाला बसला. मात्र राखी जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे ज्या वार्डातून त्यांना तिकीट मिळणार आहे तिथे भाजपात बंडखोरी होण्याचीही शक्यता आहे.
नवाब मलिक शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अध्यक्षपदी राखी जाधव यांची निवड झाली होती. पक्षाच्या कठीण काळात त्यांनी मुंबईत राष्ट्रवादी वाढवण्याचं काम केले. राखी जाधव या महापालिकेत राष्ट्रवादीच्या गटनेत्या होत्या. राखी जाधव घाटकोपरमधून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळेंच्या त्या जवळच्या मानल्या जातात. त्यामुळे जाधव यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडले आहे.