Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: राज्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येत असून, दुसरीकडे बिहार निवडणुका आणि अन्य मुद्द्यांवरून राष्ट्रीय पातळीवरील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांनी ७५ व्या वर्षी निवृत्त होण्यावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष भाजपावर टीका करत आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत आहेत. एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी सांगितलेल्या एका आठवणीचा संबंध पंतप्रधान मोदी यांच्या निवृत्तीशी जोडला जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राजकीय घडामोडींवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
चातुर्मास सुरू झाला असून, या निमित्ताने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती मुंबईत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे गौरव आहेत. ते हिंदूंचे गौरव आहेत. त्याच्याशी संबंधित जे काही आहे ते आपल्या सर्वांसाठी एक वारसा आणि आदरणीय आहे. तसेच त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांचा जागतिक स्तरावर सन्मान होत असेल तर ती चांगली बाब आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नमूद केले.
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय?
नरेंद्र मोदी यांच्यानंतर राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी दुसरे चेहरे आहेत, असे काँग्रेसकडून म्हटले जात आहे. यावर बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी यांचा चेहरा एक पर्याय म्हणून पुढे केला जात असेल, तर यापेक्षा चुकीचे दुसरे काही असू शकत नाही. पक्ष आपल्या नेत्याला दुसऱ्या स्थानी ठेवत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याला क्रमांक एकवर ठेवत असतो. काँग्रेस पक्षाची वैचारिक दिवाळखोरी यावरूनच दिसून येते, असा खोचक टोला शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी लगावला.
दरम्यान, काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच स्वप्ने पडतात. काही झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसतात. मोहन भागवत हेही ७५ वर्षांचे होत आहेत. कदाचित मोहन भागवत स्वतः विषयीच बोलत असतील. आता त्यांनाही शांततेने जीवन जगावेसे वाटत असेल. आत्मचिंतन करावेसे वाटत असेल. मोहन भागवत बोलले, याचा संबंध पंतप्रधान मोदी यांच्याशी का जोडला जात आहे. ७५ वर्षांचा नियम भाजपाने पक्षांतर्गत बाबतीत ठरवला आहे, आता तो नियम राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोहन भागवत यांना लागू करायचा असेल. असा विचार का करत नाही. प्रत्येक गोष्टीत पंतप्रधान मोदी यांच्याशी जोडायची गरज नाही. मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव घेतले नाही, तरी तुम्ही संबंध का जोडत आहात, असा सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला आहे. ते टीव्ही९शी बोलत होते.