ओला चालकाने मोबाइल चार्जिंगच्या नादात सात जणांना चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 08:51 AM2022-09-22T08:51:59+5:302022-09-22T08:53:04+5:30

घाटकोपरमधील घटना, सीसीटीव्हीमध्ये घटनाक्रम कैद, ओला चालकाच्या मित्राचा प्रताप, दोन जणांना अटक

Seven people were crushed by the sound of mobile charging | ओला चालकाने मोबाइल चार्जिंगच्या नादात सात जणांना चिरडले

ओला चालकाने मोबाइल चार्जिंगच्या नादात सात जणांना चिरडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोबाइल चार्जिंगच्या नादात ब्रेकऐवजी ॲक्सिलेटरवर पाय पडल्याने ओला चालकाच्या रिक्षाचालक मित्राने ५० मीटरपर्यंत वाहनांसह पादचाऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये बुधवारी घडली. या घटनेत सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी चालक राजू रामविलास यादव (४२) याला अटक केली आहे.

पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर पूर्वेकडील पुष्पविहार जंक्शन येथे बुधवारी दुपारी पाऊणच्या सुमारास ही घटना घडली. घाटकोपरच्या कामराज नगर येथील रहिवासी असलेला राजू यादव रिक्षाचालक आहे. तो ओला चालक मित्राच्या टूरिस्ट कारमध्ये मोबाइल चार्जिंग करण्यासाठी बसला. त्याने चार्जिंगसाठी गिअरमधील गाडी सुरू केली. गाडी सुरू होताच गोंधळलेल्या राजूने गाडी थांबविण्याच्या प्रयत्नात ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबला. त्यामुळे गाडी आणखी वेगात पुढे गेली. वेगात असलेल्या गाडीने एक कार, तीन रिक्षा यांना धडक दिली. तसेच काही पादचाऱ्यांनाही उटवले.  ५० मीटरपर्यंत गाडी पुढे गेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. जखमींना स्थानिकांच्या मदतीने तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजेंद्रप्रसाद बिंदवय (४९),  सपना रवींद्र सनगरे (३५),  आदित्य सनगरे (९),  वैष्णवी काळे (१६), जयराम यादव (४६), श्रद्धा सुशविरकर (१७), भरतभाई शहा (६५) जखमी झाले आहेत. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पंतनगर पोलिसांनी यादवला अटक केली आहे. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. 

 

Web Title: Seven people were crushed by the sound of mobile charging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.