सराईत आरोपीला अटक करून सात गुन्ह्यांची उकल, क्राईम ब्रांचची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 15:31 IST2022-10-20T15:29:42+5:302022-10-20T15:31:23+5:30
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्टला शहरात राहणाऱ्या सलमा मेहतर (४४) या रात्रीच्या वेळी घराबाहेर रस्त्यावर फोनवर बोलत होत्या.

सराईत आरोपीला अटक करून सात गुन्ह्यांची उकल, क्राईम ब्रांचची कारवाई
नालासोपारा (मंगेश कराळे) - रस्त्यावर फोनवर बोलत असताना महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपीला नालासोपारा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. आरोपीकडे चौकशी केल्यावर सहा घरफोडीचे गुन्हे उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून १९ मोबाईल, अंदाजे १२ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्टला शहरात राहणाऱ्या सलमा मेहतर (४४) या रात्रीच्या वेळी घराबाहेर रस्त्यावर फोनवर बोलत होत्या. त्याचवेळी आरोपीने त्यांना मारहाण केल्याने बेशुद्ध झाल्या. तसेच त्यांच्या डाव्या कानाला तीक्ष्ण हत्याराने वार करून दुखापत करत चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चमकी असा ऐवज जबरीने घेऊन गेला. नालासोपारा पोलिसांनी २२ ऑगस्टला गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमला आरोपी मंगळसूत्र विकायला येणार आहे तसेच हा घरफोडी करायचा ही खात्रीपूर्वक माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी आरोपी शिफत शेख (१९) याला हनुमान नगर परिसरातून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर मागील काही दिवसांमध्ये सहा घरफोडी केल्याचे त्याने कबूल केले आहे. पकडलेला आरोपी हा मूळ पश्चिम बंगाल राज्यातील असून तो नालासोपाऱ्यात बहिणीकडे राहायचा. आरोपी दिवसा घरी झोपायचा आणि रात्रीच्या वेळी घरफोडी करायचा. कामाला जायचो सांगून घराच्या बाहेर पडायचा. त्याला नालासोपारा शहरात राहण्यासाठी घर घ्यायचे होते म्हणून घरफोडी करत असल्याचे पोलिसांना सांगितले.