'Serious attention should be paid to the case of vandalism on the palace, peace, citizens should keep peace' ajit pawar | 'राजगृहावरील तोडफोड प्रकरणाची गंभीर दखल, नागरिकांनी शांतता पाळावी' 

'राजगृहावरील तोडफोड प्रकरणाची गंभीर दखल, नागरिकांनी शांतता पाळावी' 

ठळक मुद्देभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे.

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,  असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल. लोकांनी शांतता पाळावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही. त्यामुळे, नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे  स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण शांतता ठेवली पाहिजे, राजगृहावर दोन अज्ञातांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घातलं आहे. सर्वच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. या प्रकाराची चौकशी सुरु आहे, अत्यंत चोख काम पोलिसांनी केले आहे. त्यामुळे सर्व जनतेने शांतता राखावी, राजगृहाच्या आजूबाजूला जमू नये अशी आग्रहाची विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

तसेच विरोधी पक्षानेही यावर भाष्य करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृह' यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मागणी केली आहे. त्यांनी भीमराव (दादासाहेब) आंबेडकर आणि पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा केल्याचंही सांगितलं आहे.
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Serious attention should be paid to the case of vandalism on the palace, peace, citizens should keep peace' ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.