Join us
Daily Top 2Weekly Top 5

तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 17:35 IST

Senior Actor Sayaji Shinde Meets Raj Thackeray: नाशिकमधील तपोवन वाचवा मोहिमेला वेग मिळला असून, अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज ठाकरे यांची विशेष भेट घेतली.

Senior Actor Sayaji Shinde Meets Raj Thackeray: नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमाळ्याची तयारी सुरू आहे. साधुग्रामसाठी तपोवनातील तब्बल १७०० झाडे तोडणे, पुर्नरोपण करणे वा फांद्यांची छाटणी करावी लागणार असल्याची नोटीस महापालिकेने दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीच्या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी आणि अनेक कलाकारांनी तीव्र संताप व्यक्त केला. अभिनेते सयाजी शिंदे सातत्याने या वृक्षतोडीला विरोध करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी, पक्षांनी या वृक्षतोडीला जोरदार विरोध दर्शवला आहे. यातच सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनीही या वृक्षतोडीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 

साधुग्रामसाठी तपोवनातील वृक्षतोडीबाबत राज ठाकरे यांनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिकमधील तपोवन वाचवा मोहिमेला वेग मिळला असून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज ठाकरे यांची विशेष भेट घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यावेळी उपस्थित होते. बैठकीत तपोवनचे जतन, परिसरातील जैवविविधतेचे रक्षण आणि स्थानिकांच्या सहभागातून मोहीम अधिक व्यापक करण्याबाबत चर्चा झाली. राज ठाकरे यांनी मोहिमेबद्दल सकारात्मक भूमिका दर्शवली असून, पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक ते सहकार्य देण्याची तयारी दर्शवली, असे मनसेने म्हटले आहे.

कुंभमेळ्याबाबत आदर आहे, पण वनराई तुटायला नको

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सयाजी शिंदे यांनी सांगितले की, राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. झाडे कशी वाचली पाहिजेत, याबाबत बोलणी झाली. वेगळी झाडे वगैरे लावता येत नाही. १५ फुटांची झाडे याला काही अर्थ नाही. ज्या ठिकाणी झाडे जगली नाहीत तिथे १५ फुटांची झाडे कशी लागणार? मुद्दा असलेल्या झाडांचा आहे, ती झाडे का तोडायची आहेत? ती झाडे तोडायची नाहीत हाच मुद्दा आहे, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे.  कुंभमेळा व्हावा, याबाबत आदर आहे. परंतु, आत्ता तिथे आहेत, ती झाडे तोडली जाऊ नयेत. वनराई आहे, देवराई आहे ती तुटायला नको ही आमची भूमिका आहे. झाडांशिवाय बाकी कुणी काय बोलते ते काही कळत नाही. तपोवनाच्या आंदोलनाला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली, अशी माहिती सयाजी शिंदे यांनी दिली. 

दरम्यान, ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांची भेट घेणार आहे. उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहे. आम्ही सरकारचे शत्रू नाही. आमची भूमिका सरकारला समजली पाहिजे. अजित पवारांनी पाठिंबा दिला, याचा आनंद आहे. वेळ पडली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे. 

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sayaji Shinde meets Raj Thackeray over Tapovan deforestation issue.

Web Summary : Actor Sayaji Shinde met Raj Thackeray regarding the proposed felling of 1700 trees in Tapovan for the Nashik Kumbh Mela. Shinde seeks support to save the trees, emphasizing the importance of preserving the area's biodiversity. Thackeray expressed support and willingness to help protect the environment.
टॅग्स :कुंभ मेळातपोवनतपोवननाशिकसयाजी शिंदेराज ठाकरेमनसे