Video : आदित्य ठाकरेंना पाहताच आमदार नितेश राणेंनी केलं म्याव.. म्याव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 12:17 IST2021-12-23T11:48:44+5:302021-12-23T12:17:43+5:30
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते.

Video : आदित्य ठाकरेंना पाहताच आमदार नितेश राणेंनी केलं म्याव.. म्याव...
मुंबई - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस कॉपी आणि माफीने गाजला. तसेच, राज्यात भरतीच्या परींक्षांमध्ये सुरू असलेला घोळ आणि भ्रष्टाचार यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सभागृहात आक्रमपणे आपली भूमिका मांडत होते. यावेळी, भास्कर जाधव यांच्याविरुद्ध आपण हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही विरोधकांनी पायऱ्यावर बसून केली.
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते. त्यावेळी, नेमकं आदित्य ठाकरे पायरी चढून वर जात असताना, नितेश राणेंनी त्यांच्याकडे पाहून म्याव, म्याव... असा आवाज काढला. नितेश राणेंच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.
मुंबई - आदित्य ठाकरेंना पाहताच आमदार नितेश राणेंनी केलं म्याव, म्याव.. pic.twitter.com/xyjNGAwzWF
— Lokmat (@lokmat) December 23, 2021
आमदार नितेश राणे हे सातत्याने शिवसेना आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत असतात. ट्विटरच्या माध्यमातूनही ते मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंवर टीका करतात. त्यातच, शिवसेना नेत्यांनाही त्यांच्याकडून सातत्याने टार्गेट केलं जातं. नितेश राणे यांनी यापूर्वीही दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. “दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख झाला होता. मुंबई पोलीस त्यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत का? कायदा सर्वांसाठी समान असतो,” असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंनी आमदार भास्कर जाधव यांना सोंगाड्या म्हटले आहे. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. विधानसभा सभागृहात त्यांनी मोदींची नक्कल केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. त्यानतंर, जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. याच नक्कल घटनेवरुन नितेश राणेंनी भास्कर जाधव यांना सोंगाड्या असे संबोधले.