सातारा ड्रग्ज फॅक्ट्रीमागच्या फायनान्सरचा शोध सुरू, ११५ कोटींचे एमडी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:11 IST2025-12-16T16:11:20+5:302025-12-16T16:11:52+5:30
निर्जनस्थळासाठी रस्ता अन् बरच काही..

सातारा ड्रग्ज फॅक्ट्रीमागच्या फायनान्सरचा शोध सुरू, ११५ कोटींचे एमडी जप्त
मुंबई : सांगलीपाठोपाठ सातारा ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त करत गुन्हे शाखेने ११५ कोटींचे एमडी जप्त केले. या कारवाईत गुन्हे शाखेने बाजारात एमडी ड्रग्जची विक्री करणारा, तसेच अन्य कामगारांना अटक केली. मात्र, यामागे नेमके कोण आहे?, कोण फायनान्स करत होते? याचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. ओमकार डिगेच्या ओळखीनेच विशाल मोरे या टोळीच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे.
जावळी तालुक्यातील बामणोलीजवळील सावरी गावातील एका शेतघरात आरोपी विशाल मोरे आणि त्याचे साथीदार एमडी उत्पादन करत होते. येथील जमीन गोविंद बाबाजी सिंदकर यांच्या मालकीची असून, ती गावातील ओमकार डिगेच्या मध्यस्थीने सद्दाम नजर अब्बास सय्यद या व्यक्तीला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती.
डिगे हा या गावालगत असलेल्या पावशेवाडीचा रहिवासी आहे. या स्पॉटच्या शेजारीच पर्यटनस्थळ आहे. बारावीपर्यंत शिकलेला मोरे हा या भागात फिरण्यासाठी येत असताना त्याची ओळख ओमकार सोबत झाली. ओमकारच्या ओळखीतूनच विशाल मोरे येथे जोडला गेल्याचे समोर आले. मात्र फॅक्ट्रीत प्रत्यक्षात काय सुरू आहे? याबाबत अनभिज्ञ असल्याचे ओमकारने पोलिसांना सांगितले. त्यानुसार सुरुवातीला त्याला ताब्यात घेत सोडण्यात आले.
दुसरीकडे ओमकारने मोरेसह पश्चिम बंगालमधील कामगारांना या कारखान्याशी जोडले. तसेच, येथीलच एका लॉजवर त्यांची राहण्यासह खाण्या-पिण्याची सोय केल्याचा आरोप आहे. मात्र, त्याच्या नेमक्या सहभागाबाबत पोलिस तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
या कारखान्यात तयार झालेला एमडी विकण्यासाठी आलेल्या दुकलीला मुलुंड येथून अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून पोलिस या कारखान्यापर्यंत पोहोचले होते.
निर्जनस्थळासाठी रस्ता अन् बरच काही...
जंगलापासून काही अंतरावर असलेल्या या बंद फार्म हाऊसपर्यंत जाण्यासाठी सरकारी खात्यातून लाखो रुपये खर्च करून काँक्रीटचात रस्ता तयार करण्यात आला होता. तसेच कारखान्याची लाइट गेल्याने विद्युत वाहिनीतून चोरून वीज घेतल्याचेही समजते. कारखान्याचे नियोजन कधीपासून सुरू होते?, कुणाच्या सांगण्यावरून सुरू होते?, यांसह अनेक प्रश्नांचे गूढ कायम आहे.