उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 06:46 IST2026-01-15T06:46:18+5:302026-01-15T06:46:18+5:30
गुरुवारीही मुंबईवर प्रदूषके कायम राहणार

उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
मुंबई: आज मतदानाच्या दिवशी आकाश किंचित ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तर कमाल तापमान ३४ व किमान तापमान १८ ते २१ दरम्यान राहू शकते, दुपारी १२ ते ३ दरम्यान मतदारांना उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. आर्द्रतेतील चढ-उतारामुळे मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता आहे.
मुंबईत कमाल तापमान ३४ अंश, तर किमान तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. बदलत्या वातावरणामुळे दुपारी १२ ते ३ दरम्यान उन्हाचा तडाखा जाणवेल. परिणामी, यावेळेत ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दिव्यांग यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारीही मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा मध्यम नोंदविण्यात आला असून, मुंबईवर दिवसभर प्रदूषकांचा थर होता. विशेषतः दुपारी ही प्रदूषके मोठ्या प्रमाणावर दिसत होती. रेल्वे रुळांवर ५०० ते १ हजार मीटरनंतरची दृश्यमानता कमी झाली होती. गुरुवारीही मुंबईवर प्रदूषके कायम राहणार असून, हवेच्या गुणवत्तेचा दर्जा मध्यम नोंदविला जाण्याची शक्यता आहे.
कमाल तापमान ३१ ते ३४ अंश राहील. सकाळी किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस असू शकते. आकाश अंशतः ढगाळ राहील. कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ