विद्यार्थांचा शालेचा प्रवास धोक्याचा...

By नितीन जगताप | Published: December 3, 2023 09:12 AM2023-12-03T09:12:28+5:302023-12-03T09:13:47+5:30

विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक; ७ महिन्यांत ३५९ वाहनांवर कारवाई

School trip dangerous in mumbai | विद्यार्थांचा शालेचा प्रवास धोक्याचा...

विद्यार्थांचा शालेचा प्रवास धोक्याचा...

नितीन जगताप, मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य शासनाने अत्यंत काटेकोर नियमावली लागू केली असली, तरी नियमावलीची  अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे अद्यापही अनेक विद्यार्थी असुरक्षित वाहनांतून शाळेत जात आहेत. हा प्रवास विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. 
द्यार्थ्यांची अवैध वाहतूक; ७ महिन्यांत ३५९ वाहनांवर कारवाई

२१.४७ लाख रुपयांचा दंड :

विद्यार्थ्यांची अवैध्य वाहतूक करणाऱ्या वाहनांना झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने समितीमार्फत अभ्यास केला आणि स्कूल बस नियमावली २०११ मध्ये लागू केली आहे. मात्र, आजही विद्यार्थ्यांचा अवैध प्रवास सुरूच असल्याचे चित्र आहे. मुंबईत  चारही आरटीओ विभागातून एकूण ३५९ दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात रिक्षा-टॅक्सी, खासगी वाहन, शालेय बस आणि इतर बसचा समावेश आहे. त्यांच्याकडून एकूण२१,४७,९०१ रुपयांचा दंड वसूल केला.

नियमांचे उल्लंघन करत विद्यार्थी वाहतूक :

शालेय बसचे शुल्क सर्व पालकांना परवडणारे नाही, त्यामुळे आम्ही मुलांना कमी पैसे असलेल्या खासगी वाहनांतून शाळेत पाठवतो, असे काही पालकांचे म्हणणे आहे. मात्र, खासगी वाहतूकदार सुरक्षेच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत विद्यार्थी वाहतूक करत आहेत. या वाहनात अग्निसुरक्षा यंत्रणा, प्रथमोपचार साहित्य, औषधे, विद्यार्थ्यांच्या बॅगा व इतर शालेय साहित्य ठेवण्यासाठी जागा नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास जीवघेणा सुरू आहे.

कोणत्या नियमांचे  उल्लंघन? 

मुंबई शहर आणि उपनगरात सर्रासपणे विद्यार्थ्यांची अधिकृत शालेय बसऐवजी अवैध खासगी वाहनातून वाहतूक केली जातेय. वैध परवाना नसणे, शालेय बसची योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपणे, रिक्षा किंवा टॅक्सीमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ने-आण करणे, असे प्रकार घडत आहेत. तर, दक्षिण मुंबईत चक्क पांढऱ्या नंबर प्लेट असलेल्या वाहनातून, आयुर्मान संपलेल्या वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते.

विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात सर्व नियमांचे पालन स्कूल बसमध्ये करण्यात येते. याउलट स्कूल व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. मुंबईत दहा हजार खासगी वाहनांतून विद्यार्थी वाहतूक केली जाते. परंतु, आरटीओकडून खूप कमी कारवाई केली जाते. - अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन

Web Title: School trip dangerous in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.