हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 10:15 IST2025-11-04T10:15:17+5:302025-11-04T10:15:33+5:30
Mumbai Chembur School Controversy: मुंबईतील सेंट ॲन्थोनी गर्ल्स हायस्कूलला शिक्षण विभागाने बजावली नोटीस

हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हातावर मेहंदी लावल्याने चेंबूरमधील सेंट ॲन्थोनी गर्ल्स हायस्कूलमधील १५ ते २० विद्यार्थिनींना वर्गात बसू न दिल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्यानंतर उपशिक्षणाधिकाऱ्यांनी सोमवारी शाळेला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. याबाबत खुलासा करण्याची नोटीस शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांनी शाळेला दिली आहे. संंबंधित नोटीस ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे.
शाळेने मात्र असा प्रकार घडल्याचा इन्कार करत ‘आम्ही फक्त शाळेचे आणि पीटीएचे नियम पाळले’, अशी भूमिका स्पष्ट केली. दोन दिवसांपूर्वी १५-२० विद्यार्थिनींना हातावर मेहंदी लावल्याने वर्गाबाहेर थांबवले होते, अशी तक्रार पालकांनी मनसेच्या चेंबूर विभागाकडे केली. सोमवारी मनसेचे सरचिटणीस कर्ण दुनबळे यांनी शाळेला भेट दिली. काही पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर 'लोकमत'ला सांगितले की, मेंदी लावल्यामुळे विद्यार्थिनींना वर्गाबाहेर ठेवले होते. मात्र मनसेच्या मध्यस्थीनंतर त्यांना वर्गात बसू देण्यात आले.
कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला तिची सांस्कृतिक ओळख घेऊन शाळेत येऊ नये, अशी जबरदस्ती करता येणार नाही. राज्य घटनेने सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार दिला आहे. आमच्या विनंतीनंतर आमच्या समोरच  विद्यार्थिनींना वर्गात बसवण्यात आले. पुढील टप्प्यात मनसे स्टाईल आंदोलन होईल.
-कर्ण दुनबळे, सरचिटणीस, मनसे