School bells; But to drink water | शाळेची घंटा वाजणार; मात्र पाणी पिण्यासाठी
शाळेची घंटा वाजणार; मात्र पाणी पिण्यासाठी

मुंबई : शरीरात पाण्याची मात्रा कमी झाल्यास विविध आजार होण्याची शक्यता असते. शरीराला पाण्याची फार गरज आहे. मात्र, शालेय दिवसांत अनेक कारणांनी विद्यार्थी शाळेत नेण्यात येणाऱ्या पाण्याच्या बाटल्या तशाच माघारी आणत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून आता मुंबई, पुण्यातील काही खासगी शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये शाळेत दिवसातून तीनदा बेल वाजेल आणि तेव्हा विद्यार्थ्यांना पाणी प्यावे लागेल.

शालेय विद्यार्थ्यांना पाणी कमी प्यायल्याने त्रास होऊ नये, यासाठी केरळमधील एका शाळेने नुकताच शाळेत ‘वॉटर बेल’ हा अनोखा उपक्रम सुरू केला. त्याच धर्तीवर आता असोसिएशन आॅफ प्रायमरी एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेनेसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत देशभरातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सर्व शाळांना पत्र पाठवून सूचना केल्या आहेत. हा उपक्रम राबविण्याआधी या संस्थेकडून मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू येथील ९०० पालक, ९०० शिक्षक आणि ६ ते १० वयोगटांतील ६० मुले यांचे सर्वेक्षण केले. यामधून ६८% पालक हे आपला पाल्य पाणी न पिता पाण्याची बाटली तशीच घरी आणत असल्याची तक्रार करता असल्याचे समोर आले.

शाळेत मुलांकडून आवश्यक प्रमाणात पाणी का प्यायले जात नाही, हे जाणून घेतले असता, वर्गात मुलांना पाणी पिऊ दिले जात नसल्याचे ६८% पालकांनी सांगितले, ६९% मुलांनी अभ्यासाचे टिपण करताना पाणी प्यायचे विसरतो, असे नमूद केले. वर्ग सुरू असताना स्वच्छतागृहात शिक्षक पाठवित नाहीत, या भीतीमुळे पाणी पित नसल्याचे ७२% मुलांनी सांगितले.

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सवयींकडे शिकविण्याच्या ओघात विसर पडत असल्याचे ८८% शिक्षकांनी नमूद केले. ६६% शिक्षकांनी विद्यार्थ्यांजवळ पाण्याच्या बाटल्या नसल्याने, त्यांना सारखे उठून जाण्याची परवानगी देता येत नाही, असे कारण दिले, तर वर्गात शिकविला जाणारा महत्त्वाचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून स्वच्छतागृहात गेल्यामुळे चुकू नये, म्हणून परवानगी देता येत नसल्याचे ७९% शिक्षकांनी सांगितले.

हे लक्षात आल्यानंतर जर शाळेनेच पुढाकार घेतल्यास ही समस्या दूर होईल, असा विचार करून हा उपक्रम राबवित असल्याचे असोसिएशन आॅफ प्रायमरी एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेच्या अध्यक्ष स्वाती पोपट यांनी सांगितले.

‘सरकारी शाळांनाही पत्र पाठविणार’
देशभरातील संस्थेशी निगडित सर्व शाळांना या संदर्भात लेखी पत्र पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत पुणे, दिल्ली, बंगलोर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये ५३ खासगी शाळांमध्ये हा उपक्रम सुरू केला आहे. लवकरच सरकारी शाळांनाही पत्र पाठवून हा उपक्रम राबविण्याबाबत विनंती करणार असल्याची माहिती असोसिएशन आॅफ प्रायमरी एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेच्या अध्यक्ष स्वाती पोपट यांनी दिली.

Web Title: School bells; But to drink water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.