Join us

सावरकरांच्या नातवाची शिवसेनेवर नाराजी; मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नसल्याची खंत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 19:53 IST

रणजीत सावरकरांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे.

मुंबई - काँग्रेस सेवादलाने छापलेल्या पुस्तिकेत वीर सावरकरांच्या उल्लेखाने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पुस्तकाविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी नाराजी व्यक्त करत या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रणजीत सावरकर यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भेटण्यासाठी गेले असता त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. 

रणजीत सावरकरांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. त्याचसोबत या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा यासाठी ते आग्रही आहेत. रणजीत सावरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. पण त्यांना उद्धव ठाकरेंची वेळ मिळाली नाही. याबाबत नाराजी व्यक्त करताना रणजीत सावरकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना एक मिनिटही माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नाही. हा सावरकरांबद्दलचा आदर आहे. वीर सावरकरांचा हा अपमान आहे अशा शब्दात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

एकीकडे शिवसेना सावरकरांचे कौतुक करते तर दुसरीकडे अशाप्रकारची वागणूक दिली जाते. जवळपास ४० मिनिटांहून अधिक काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वाट पाहत मंत्रालयात ताटकळत बसावं लागलं. मुख्यमंत्री कार्यालयाला अनेकदा कळविले तरी मुख्यमंत्र्यांनी भेटण्याची तसदी घेतली नाही असं सांगत रणजीत सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांना न भेटताच मंत्रालयातून निघून गेले. 

दरम्यान नंदूरबार येथील सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर टीका केली  वीर सावरकरांचा हा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही. वीर सावरकर हे या देशाचे आराध्य आहेत. शिवसेना सत्तेसाठी मूग गिळून बसली असली तरी आता त्यांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल. अशांचा नायनाट आता भारताची जनता केल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :विनायक दामोदर सावरकरकाँग्रेसशिवसेनाउद्धव ठाकरे