Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 21:40 IST

फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जावे यासाठी दिनांक २० ऑक्टोबर, २०२२ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली.

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीश पहारेकऱ्यांना चुकवून फ्रान्सच्या समुद्रात मार्सेलिस बंदराजवळ "मोरिया" या बोटीवरून ८ जुलै, १९२० रोजी मारलेली उडी त्रिखंडात गाजली. हा दिवस "साहस दिन" म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जावे यासाठी दिनांक २० ऑक्टोबर, २०२२ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली. महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्मारक उभारणीची संकल्पना असून विधानसभा अध्यक्ष यांच्या दिल्ली दौऱ्यात याबाबत पुढील कार्यवाहीच्यादृष्टीने केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या ऐतिहासिक उडीला ८ जुलै, २०२२ रोजी ११२ वर्षे पूर्ण झाली. ते औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले होते. याप्रसंगी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी त्रिखंडात गाजलेल्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्व असलेल्या या प्रेरणादायी कृतीचे भावी पिढ्यांना चिरस्मरण व्हावे यादृष्टीने फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक व्हावे आणि त्यासाठी विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी बोलताना यासंदर्भात आपण व्यक्तिश: लक्ष घालून पाठपुरावा करू असे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष यांच्या या दिल्ली भेटीला विशेष महत्व आहे. 

टॅग्स :विनायक दामोदर सावरकरफ्रान्सअमित शाहराहुल नार्वेकर