सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नहीं, भुजबळांची शायरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 06:17 IST2021-09-10T06:16:52+5:302021-09-10T06:17:00+5:30
छगन भुजबळ : महाराष्ट्र सदन प्रकरणी निर्दोष मुक्तता

सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नहीं, भुजबळांची शायरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्र सदनच्या कथित घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ तसेच माजी खा. समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांची विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
पत्रकार परिषदेत भुजबळ म्हणाले, कथित घोटाळा प्रकरणात जवळपास सव्वा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले. अनेक खोटेनाटे आरोप आमच्यावर झाले तसेच मीडिया ट्रायलदेखील झाली. जे महाराष्ट्र सदन फाईव्ह स्टार हॉटेलसारखे बांधण्यात आले. देशातील अनेक व्यक्ती त्याचे कौतुक करतात. मंत्रिमंडळ बैठकीत ठरवण्यात आले होते की, या प्रकरणात १०० कोटी रुपयांचा एफएसआय देण्यात येईल, मात्र आजपर्यंत एक फूट एफएसआय त्या कंत्राटदाराला मिळाला नाही, एक रुपयाही कंत्राटदाराला दिला नाही, तरीही आमच्यावर आरोप करण्यात आले. मात्र गेले काही महिने आमच्या वकिलांनी सत्य परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केले. काही लोकांनी त्रासच द्यायचा, असे ठरवले होते. मात्र आज आलेला निकाल आम्ही अतिशय विनम्रपणे, संयमपूर्वक स्वीकारतो. कोणाबद्दल आमच्या मनात राग नाही, द्वेषबुद्धी नाही, कोणाबद्दल तक्रार नाही आणि कोर्टाच्या निकालाबद्दल आनंद आहे. ‘‘साजिशे लाखों बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए, ये जनता की दुवाएँ है, उन्हे मुक्कमल नहीं होने देती’’, या शायरीतून भुजबळ यांनी आनंद व्यक्त केला.
‘पवारांपासून सगळ्यांना माहीत होते’
शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादीतील नेत्यांना माहीत होतेच. तसेच मुख्यमंत्र्यांनाही हा विश्वास असल्याने त्यांनी मला मंत्रिमंडळात जागा दिली, असेही भुजबळ म्हणाले.